Kumbhmela : १२ वर्षांनंतर कुंभमेळ्यामधे उघडणाऱ्या नाशिकच्या गंगा गोदावरी मंदिराची रंजक माहिती
हिंदू धर्मातील सर्वात मोठा, पवित्र, धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणजे कुंभमेळा. दर 12 वर्षांनी हा कुंभमेळा भारतातील नाशिक, हरिद्वार, प्रयागराज आणि उज्जैन या चार ठिकाणी संपन्न होतो. यामध्ये लाखो भाविक पवित्र नदीच्या पाण्यात पापक्षालनासाठी स्नान करतात. पुढच्या वर्षी अर्थात 2027 साली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याला सिंहस्थ कुंभमेळा असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे, ‘सिंह’ म्हणजे सिंह राशी आणि ‘स्थ’ म्हणजे स्थित असणे. जेव्हा गुरु (बृहस्पति) ग्रह सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा काळ ‘सिंहस्थ’ म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वीच नाशिक आणि त्रंबकेश्वर येथे या कुंभमेळ्याचे ध्वजारोहण संपन्न झाले. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. (Ganga Godavari Temple)
ध्वजारोहण झाल्यानंतर नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठावर स्थित गंगा गोदावरी मंदिर उघडण्यात आले. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे, दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याच्या वेळेस हे मंदिर उघडले जाते आणि कुंभमेळा समाप्त झाला की, हे मंदिर बंद केले जाते. नाशिकमधील श्री गंगा गोदावरी मंदिर अर्थात श्री सिंहस्थ गौतमी गंगा-गोदावरी भागीरथी मंदिर हे पंचवटीतील रामकुंडाजवळ गोदावरी नदीच्या काठावर स्थित असलेले एक ऐतिहासिक आणि अत्यंत पवित्र मंदिर आहे. हे मंदिर दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने भाविकांच्या दर्शनासाठी उघडले जाते. मात्र वर्षातून गंगा दशहरा आणि त्रिपुरी पौर्णिमा म्हणजेच देव दिवाळी या दोन दिवशी पहाटे पाच वाजता पूजा-अर्चा आणि उत्सवासाठी मंदिर उघडून रात्री १२ वाजता बंद केले जाते. कुंभमेळ्याशी थेट संबंध असणारे हे मंदिर आहे. शेकडो वर्षांपासून गोदावरीच्या पुराची अनुभूती हे मंदिर घेत आहे. गाभाऱ्याची रचना अशी आहे की, नदीचे पाणी कितीही दिवस राहिले तरी मूर्तीची झीज वा अन्य काही नुकसान होत नाही, असे जाणकार सांगतात. (Nashik Kumbhmela)

श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहरामध्ये अनेक लहान-मोठी मंदिर आहेत. यात पंचवटी रामकुंड परिसरातील सिंहस्थ श्री गंगा गोदावरी मंदिर विशेष महत्त्व आहे. गोदावरी नदीच्या किनारी वसलेल्या या गंगा गोदावरी मंदिराला साधारण ७०० वर्षांची धार्मिक परंपरा असल्याचे सांगितले जाते. नाशिक महानगरपालिकेच्या माहितीनुसार, इ.स. १७७५ मध्ये गोपिकाबाई पेशवे यांनी या मंदिराची उभारणी केली. मंदिरात गौतम ऋषी, गंगा आणि गोदावरी यांच्या मूर्ती आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याशी जोडलेल्या परंपरेनुसार मंदिर 12 वर्ष बंद ठेवले जाते. दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभपर्वाच्या मुहूर्तावर मंदिराचे दरवाजे उघडले जातात. कुंभपर्वाच्या संपूर्ण कालावधीत भाविकांना येथे दर्शन घेता येते. कुंभमेळा संपल्यानंतर पुन्हा मंदिर बंद केले जाते. त्यामुळे या मंदिराचे दर्शन घेणे भाविकांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. (Latest Marathi HEadline)
या गंगा गोदावरी मंदिरामागे एक कथा सांगितली जाते. याच पौराणिक कथेनुसार, एकदा गौतम ऋषी शेतात शेती करत असताना तिथे एक गाय आली. तिला हाकलण्यासाठी त्यांनी दुर्वा गवत फेकले; मात्र त्याचे रूपांतर त्रिशुळात झाले आणि त्याचा वार लागून गायीचा मृत्यू झाला. नकळत घडलेल्या या गोहत्येमुळे गौतम ऋषींना पाप लागले. या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे तब्बल १२ वर्षे तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले. त्यानंतर गौतम ऋषींनी पापमुक्तीसाठी गंगेला पृथ्वीवर आणण्याची विनंती केली. मात्र, गंगा मातेने पृथ्वीवर येण्यास नकार देत, लोक आपल्यात स्नान करतील आणि त्यामुळे आपण अशुद्ध होऊ, अशी चिंता व्यक्त केली. (Top Stories)
त्यावर भगवान शंकरांनी गंगा मातेला वरदान दिले की, जेव्हा गुरु ग्रह सिंह राशीत प्रवेश करेल आणि सिंहस्थ कुंभपर्व सुरू होईल, तेव्हा साधू-संत गंगेत स्नान करतील. त्यांच्या स्नानामुळे गेल्या १२ वर्षांत गंगेत आलेले पाप दूर होईल आणि गंगा पुन्हा पवित्र होईल. याच पौराणिक मान्यतेनुसार सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात गंगा गोदावरी मंदिराचे दरवाजे उघडले जातात. या काळात गुप्त गंगेचे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. (Social News)
(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)

Comments
Post a Comment