Narendra Modi Birthday: ‘निर्मोही राजयोगी’ – नाबाद ७६
अर्थशास्त्रामध्ये Law of Diminishing Marginal Utility नावाचा एक प्रसिद्ध सिद्धांत आहे. एखाद्या वस्तूचा वारंवार उपभोग घेतला असता त्या वस्तूच्या उपभोगाने मिळणाऱ्या समाधानाचे/आनंदाचे प्रमाण प्रत्येक उपभोगाच्या वेळी घटत जाते असे या सिद्धांताचे सार आहे. एखाद्या निर्जीव वस्तूला/पदार्थाला अथवा अन्य कोणत्याही घटकाला लागू होणारा हा नियम राजकारणात/समाजकारणात सक्रिय असलेल्या कुठल्याही पुढऱ्याला/नेत्याला सुद्धा तेवढाच ‘फिट’ बसतो. यामुळेच राजकारणात anti-incumbency ही डाव्या विचारवंतांची आवडती संकल्पना प्रचलित आहे. एखादे नेतृत्व जर सलग काही काळ राज्य करत असेल (देशात अथवा कुठल्याही राज्यात) तर सरणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक प्रस्थापित नेतृत्वाची लोकप्रियता कणा कणाने कमी होत जाते हे गृहितक शीरसावंद्य मानणाऱ्या तथाकथित विचारवंतांना एका नेतृत्वाने मात्र धक्का दिला आहे आणि हा धक्का असा तसा नाही तर या बुद्धीवाद्यांचा आत्मविश्वास ढासळून टाकणारा, त्यांना आपल्या ठोकळेबाज मांडणीचा फेरविचार करायला लावणारा असा आहे. या नेतृत्वाचे नाव आहे Narendra Damodardas Modi, भारताचे सध्याचे प्रधानमंत्री. (Narendra Modi Birthday)

स्वर्गीय Lal Bahadur Shastri यांच्या प्रमाणेच अत्यंत गरीब आणि सर्व साधारण घरात जन्मलेले नरेंद्रभाई, शास्त्री यांच्या पावलावर पाऊल टाकत देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. २०१४ला Narendra Modi भारताचे पंतप्रधान झाले. सलग १२ वर्षें ते देशाची धुरा सांभाळत आहेत. मोदी विरोधक त्यांना सत्तेवरून उलथून टाकण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुद्धा UPA सरकारने त्यांना त्रास देण्याची एकही संधी सोडली नव्हती. मोदींना खाऊ की गिळू अशी त्या सरकारची अवस्था झाली होती. तरी सुद्धा संयमी मोदी हा माझा मार्ग एकला म्हणत आपले काम निष्ठेने करतच राहिले. यामुळेच ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचू शकले. निरनिराळ्या सर्वेक्षणातून त्यांची लोकप्रियता अधोरेखित होत आहे. साऱ्या जगात आज मोदीं इतका लोकप्रिय नेता दुसरा नाही. त्यांना अनेक देशांनी त्यांचे सर्वोच्च नागरी/राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले आहेत हे मोदींच्या लोकप्रियतेचेच प्रतिक आहे. नुकत्याच झालेल्या BRICS च्या अंतरराष्ट्रीय परिषदेतही मोदींच्या यशस्वी कूटनीतीचा प्रत्यय सर्व जगाला आला. त्यामुळे देव पाण्यात घालून १२ वर्षें होऊन गेली तरी anti-incumbency रूपी अलक्ष्मी आपल्याला पावत का नाही म्हणून विरोधक नैराश्यग्रस्त झाले आहेत. (Narendra Modi Birthday)

मोदींची लोकप्रियता तरी किती असावी? नोटबंदी सारखी कडू गोळी जनतेच्या घशात उतरवून सुद्धा मोदींच्या विश्वासार्हतेला काडीचा धक्का लागू शकला नाही. त्यापाठोपाठ GST ची अंमलबजावणी करताना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली तरी व्यापारी वर्ग मोदींच्या मागे ठामपणे उभा राहिला. २०२०-२१ च्या COVID-19 महामारीच्या साथीने मोदींच्या नेतृत्वाची कसोटीच पाहिली. जगात अनेक प्रगत/अप्रगत देशात हाहाकार माजला होता. भारतात सुद्धा आणीबाणीची स्थिती उद्भवली होती. मोदींनी lockdown पुकारून जनतेला जणू काही स्थानबद्ध केले होते. अर्थचक्र थंडावले होते आणि जनतेत उद्याच्या भविष्याबद्दल पूर्ण काळोख होता. याही स्थितीतून भारत तावून सुलाखून बाहेर पडला. पात्र गरीब जनतेसाठी गरीब कल्याण योजना राबवून जनतेच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवल्या. भारताने प्रतिबंधक लस निर्माण करून भारताबरोबरच अवघ्या जगाला फुकट लस पुरवून ‘वसुधैव कुटुंबकम’ या आपल्या संस्कृतीचा परीचय अवघ्या जगाला करून दिला. (Narendra Modi Birthday)

या सर्व परीक्षा पाहणाऱ्या काळात कठीण समय येता कोण कामास येतो? या प्रश्नाचे उत्तर होते Narendra Damodardas Modi. त्यामुळेच तमाम भारतीय नागरिक मतांच्या रूपाने मोदींच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतात. राष्ट्रहित सर्वोतपरी या आपल्या ब्रीदवाक्याला जागून मोदींनी काश्मीरचे कलम ३७० रद्दबातल केले, हजारो वर्षांच्या संघर्षातून अयोध्येला राम मंदिराची उभारणी केली, जनतेचे दैनंदिन जीवन सुखावह होण्यासाठी अनेक पावले उचलली आणि भाजपच्या वचननाम्यातील अनेक आश्वासनांची पूर्तता केली. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे म्हणतात. भारतीय नागरिक म्हणूनच आज मोदीमय झालेले दिसतात. मोदी वृत्तीने सन्यस्त असले तरी त्यांनी सन्यस्त खडग धारण केलेले नाही. सर सलामत तो पगडी पचास या न्यायानुसार भारताच्या सामरिक शक्तीला अनन्य साधारण महत्व देऊन आपल्या सीमा तर सुरक्षित केल्याच पण शत्रू राष्ट्रांना बळी तो कान पिळी अशी अद्दलही घडवली. Operation Sindoor ची विजयगाथा आज सर्व जग गात आहे हे त्याचेच द्योतक आहे. आपल्या सैनिकांवर मातेप्रमाणे ममतेचा वर्षाव करणारे हे नेतृत्व घास रोज अडतो ओठी सैनिकहो तुमच्यासाठी असे म्हणत प्रत्येक दिवाळी सीमेवरील जवानांसोबत साजरी करते, मग आपल्या सैन्यदलांचे मनोबल हिमालयाएवढे उंचावले नाही तरच नवल!! (Narendra Modi Birthday)

१७ सप्टेंबर २०२६ हा मोदीजींचा ७६ वा वाढदिवस. राष्ट्र सर्वप्रथम या Rashtriya Swayamsevak Sangh च्या विचारधारेचे चालते बोलते प्रतिक म्हणजे Narendra Modi. साध्या संघ स्वयंसेवकाच्या भूमिकेतून आपल्या राष्ट्र कार्याला सुरुवात करणारा हा द्रष्टा प्रचारक आज हिंदुस्थानची भाग्यरेषा अवघ्या जगाच्या canvas वर उंचावत आहे. बरं ही रेखा दुसरी रेषा पुसून टाकून नव्हे तर त्या लकीरीपेक्षा आपली लकीर मोठी करून. त्यामुळेच कुठलाही देश/प्रदेश पादाक्रांत न करता भारतीय अर्थव्यवस्था १२ वर्षांपूर्वीच्या ११व्या स्थानावरून पहिल्या पाचात झेपावली आहे आणि येत्या दोन वर्षातच जगातील अग्रणी तीन अर्थसत्तात सामील होण्याची आस बाळगून आहे. मोदीजी एवढ्यावरच संतुष्ट नाहीत. त्यांनी भारताला २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचा ध्यास उराशी बाळगला आहे. Think Big, Think Positive ही त्यांची मनोवृत्ती हा या आत्मविश्वासाचा स्रोत आहे. मोदींची लोकप्रियता कायम आहे याचे मूळ त्यांच्याबद्दल भारतीयांच्या मनात वर्धिष्णू होत असलेल्या त्यांच्याबद्दलच्या विश्वासाऱ्हतेत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. (Narendra Modi Birthday)

Comments
Post a Comment