Ashadhi Ekadshi : ‘या’ चविष्ट रेसिपी करून यंदाची आषाढी एकादशी करा अधिकच खास

दोनच दिवसांवर आषाढी एकादशी आली आहे. महत्वाची एकादशी असल्याने या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरी उपवास केला जातो. एकादशीचा उपवास असल्याने दोन्ही वेळेस फराळाचेच खाल्ले जाते. आता उपवास म्हटल्यावर साबुदाणा, भगर हेच सर्वात आधी डोळ्यासमोर येते. मात्र आता उपवासाच्या पदार्थांमध्ये देखील खूपच व्हरायटी आलेली दिसते. उपवासाच्या गोष्टींचा वापर करून विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ केले जातात. उपवासाच्या दिवशी दोन्ही वेळेला तेचतेच खाऊन कंटाळा येत असले तर यंदाच्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नवीन उपवासाच्या रेसिपी ट्राय करू शकता. 

उपवासाची बटाटा भाजी
साहित्य
: 1 चमचा तूप/ तेल, 1/2 चमचा जिरे, 2 चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, उकडून सोलून चिरून घेतलेले बटाटे, भाजलेले शेंगदाण्याचे कुट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती : कढईत तूप किंवा तेल गरम करा आणि त्यात जिरे घाला. जिरे तडतडायला लागले की त्यात हिरवी मिरची-आले पेस्ट घालून एक मिनिट परतून घ्या. बटाटे, भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट पूड, मीठ घाला आणि सुमारे 4-5 मिनिटे परतून घ्या कोथिंबीर घाला आणि उपवासाची बटाटा भाजी तयार आहे. 

उपवासाचा बटाटावडा
साहित्य
: उकडलेले बटाटे, चार – पाच हिरव्या मिरच्या, लाल तिखट, आल्याचे तुकडे, वरीचे पीठ, साबुदाणा पीठ पाव वाटी, बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल अथवा तूप

कृती : आधी उकडलेले बटाटे मॅश करून त्यात हिरवी मिरची पेस्ट, आल्याची पेस्ट अथवा तुकडे आवडीनुसार मिक्स करा. तेलावर हे परतून बटाट्यामध्ये घाला आणि तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याचे कूटही घालू शकता. त्यात मीठ घाला. या मिश्रणाचा वड्याचा आकार करून घ्या. वरी पीठ, साबुदाणा पीठ, मीठ, तिखट आणि सोडा मिक्स करून पाणी घालून भिजवून मिश्रण तयार करा. तयार बटाट्याचे गोळे या मिश्रणात बुडवून वडे तळा. 

उपवासाचे थालीपीठ
साहित्य
: २ वाट्या साबुदाणा, २ मध्यम उकडलेले बटाटे, १/२ वाटी शेंगदाण्यांचे कूट, ५-६ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा जीरे, १/२ चमचा जीरेपूड, चवीपुरते मिठ, तेल/ तूप, थालीपीठ थापण्यासाठी प्लास्टीकची शीट किंवा पिशवी

कृती : साबुदाणे पाण्यात ३-४ तास भिजत ठेवावेत. उरलेले पाणी काढून टाकावे. शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावे. प्लास्टीक शिटला तूपाचा हात लावून गोळे थापावे. थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करावे. नॉनस्टीक तव्यावर थोडे तूप सोडावे. मिडीयम हाय हिटवर थालिपीठाला झाकण ठेवून वाफ काढावी. दोन्ही बाजूने खरपूस करून घ्यावे. दही किंवा उपवासाच्या चटणीसोबत हे थालीपीठ छान लागते. मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात. भिजवलेला साबुदाणा, शिजवलेले बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, जीरेपूड, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे. 

साहित्य – 1 वाटी साबुदाणे, 2 हिरव्या मिरच्या, ओले खोबरे, दाण्याचे कूट, जिरे, चवीपुरते मीठ, तूप

कृती – साबुदाणा रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी मिक्सरमधून वाटून करुन घ्या. आता त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचे कूट, मीठ सर्व मिक्स करा. नेहमीच्या घावनाप्रमाणेच हे सारण सरसरीत करावे. नॉनस्टिक तव्याला तूप लावा आणि घावन करुन घ्या. खोबऱ्याच्या चटणीहे उत्तम लागतात. शिवाय उपवासाची बटाटा भाजीही तुम्ही करु शकता. 

रताळ्याच्या गोड फोडी
साहित्य
– 4 ते 5 मध्यम आकाराचे रताळे, दिड वाटी गूळ किंवा साखर

कृती – रताळी स्वच्छ धुवून, त्याच्या गोलाकार चकत्या करा. त्यानंतर एक कढई गॅसवर तापायला ठेवा. कढई तापली की त्यात तूप घाला. तूप तापल्यानंतर त्यात रताळ्याच्या फोडी टाका आणि व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर कढईवर झाकण ठेवा आणि वाफ येऊ द्या. फोडी थोड्या मऊ झाल्या की त्यात गूळ आणि साखर घाला. काही मिनिटातच साखरेचा किंवा गुळाचा पाक होतो. आता त्या पाकात फोडी चांगल्या शिजून घ्या. 

उपवासाचे रगडा पॅटीस
साहित्य
– 1 वाटी शेंगदाणे, 1 मोठा चमचा साजूक तूप, जिरे, ओले खोबरे, आले – मिरची पेस्ट, आमसूल, चवीनुसार मीठ आणि गूळ, तिखट, उकडलेले बटाटे

कृती – शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी उपसून साधारण त्याला 5 शिट्ट्या कुकरमध्ये द्या. थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून घ्या. कढईत तूप तापवा त्यात जिरे, खोबरे, उकडलेले बटाट, आले – मिरची पेस्ट आणि मीठ, दाण्याचे कूट घालून नीट शिजवून घ्या. याचे पॅटीस तयार करा आणि ते तेलावर अथवा तूपावर शेकून घ्या. शेंगदाण्याच्या पेस्टमध्ये पाणी घालून त्यात आमसूल, मीठ, गूळ आणि वरून जिऱ्याची तूपाची फोडणी घालून रगडा तयार करून घ्या. पॅटीसवर हा रगडा आणि तुम्हाला हवं असल्यास, चिंचगूळाची चटणी आणि हिरवी चटणी घालून या रगडा पॅटीसची चव अधिक वाढवा. 

उपवासाचा दहीवडा
साहित्य
: 4 बटाटा, दीड वाटी उपवासाची भाजणी, राजगिरा आणि शिंगाडा पीठ दाणेकूट एक कप, दही मोठ्या तीन वाट्या, हिरव्या मिरच्या 2/3, जिरे एक चिमूट, तिखट, मीठ, चिरलेली थोडी कोथिंबीर, तूप तळणीसाठी

कृती : एका परातीत उकडून साले काढलेले बटाटे, दाणे कूट, सर्व पीठे, तिखट, मीठ घ्या. सर्व पदार्थ एकजीव मळून घ्या. या मिश्रणाचे लाडूच्या आकाराचे लहानसर गोळे करा. कढईत तूप गरम करा. हे गोळे लालसर रंगावर तळून घ्या. नंतर एका रुंद तोंडाच्या भांड्यात किंवा पसरट बाऊलमध्ये दही घ्या. त्यात मिरची, आले वाटण, मीठ घाला. दही तसेच पाणी न टाकता रवीने घुसळून घ्या. यात तळलेले गोळे टाका. वरून चिरलेली कोथिंबीर पेरा आवडत असेल तर काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा. नंतर खा.

केळी रायता
साहित्य
: पिकलेली केळी ३, कोरडे खोबरे किसलेले १/२ कप, लिंबू १, साधे दही १ कप, बारीक कापलेले बदाम

कृती : बारीक किसलेले खोबरे तांबुस होईपर्यंत भाजा. केळ्यांचे तुमच्या आवडीनुसार काप करा. त्या कापांना लिंबाचा रस लावा म्हणजे केळी काळी पडणार नाहीत. त्या कापांमधे दही, खोबरे आणि बदाम टाकून चांगले एकत्र करा. रायता तयार. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यात थोडी साखर घालू शकता. 

रताळ्याचा स्टफ पराठा
साहित्य
: अर्धा किलो रताळ, 200 ग्रॅम शिंगाड्याचं पीठ, 200 ग्रॅम राजगिरा पीठ, साजूक तुप आणि आवडीनुसार वेलची पावडर

कृती : पराठे करण्यासाठी सर्वप्रथम रताळी उकडून घ्यावीत. मग ती सोलुन कुस्करुन घ्या. कढईत थोडं तूप घालून मंद आचेवर कुस्करलेरी रताळी परतावीत. खमंग वास सुटला की त्यात वेलची पावडर त्यात टाकून आता गॅस बंद करावा आणि मिश्रण थंड होऊ द्यावे. तोपर्यंत दुसरीकडे शिंगाड्या आणि राजगिऱ्याची पीठ एकत्र करुन पाण्याने मळून घ्यावे. आता छोटी पारी बनवून त्यात तयार केलेले सारण भरावे. पराठा लाटून तव्यावर शेकण्यासाठी टाकावा. बटाट्याच्या पराठ्याप्रमाणे रताळ्याचा हा पराठा शेकून घ्यावा. शेकताना पराठ्यावर तूप सोडा. तयार आहे उपवासाचे खमंग आणि चविष्ट असे रताळ्याचे पराठे.

this blog was originally published on https://gajawaja.in/ashadhi-ekadashi-fasting-recipe/

Comments

Popular posts from this blog

Health : कॅन्सर होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

North Korea : नो आईस्क्रीम…नो हॅम्बर्गर !