First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

 इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम सुरू केली. चाळीस दिवसांनंतर या युद्धातून काहीही साध्य न करता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंधरा दिवसांचा युद्धविराम जाहीर केला. वास्तविक, यामागे ट्रम्प यांच्याभोवती उठलेले वादळ आहे. इराण युद्धामुळे अमेरिकेच्या तिजोरीवर दरदिवसाला काही अब्ज डॉलर्सचा बोजा पडत होता. यामुळे तेथील जनजीवनावरही त्याचा परिणाम होऊ लागला होता. परिणामी अमेरिकेतही ट्रम्पविरोधी वातावरण होऊ लागले आहे. मात्र या सर्वाकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी कानाडोळा करत आणखी एक कारनामा केला आहे की, त्यातून जनतेचा त्यांच्यावरील रोष वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पत्नीसाठी, मेलानिया ट्रम्प यांच्यासाठी, ७० दशलक्ष डॉलर्सच्या जेटच्या खरेदीचा प्रस्ताव ठेवला आहे. ‘बिग ब्युटीफुल’ नावाचे बोईंग ७३७ मॅक्स ८ जेट अमेरिकेच्या फर्स्ट लेडीच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. एकीकडे इराण युद्धामुळे अमेरिकेला मोठा फटका बसला असताना मेलानिया यांच्या ऐषोआरामासाठी एवढे महागडे हवाई जहाज कशाला हवे, हा प्रश्न आता विचारला जात आहे.

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा युद्धविराम जाहीर झाला आहे. त्यानंतर या युद्धासाठी अमेरिकेने किती डॉलर्स खर्च केले आहेत, याची माहिती पुढे येत आहे. मार्च २०२६ च्या अहवालानुसार, अमेरिकेने इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पहिल्या काही दिवसांतच अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. १५ मार्च २०२६ पर्यंत, अमेरिकेच्या वरिष्ठ सल्लागारांनुसार, अमेरिकेने लष्करी उपकरणे आणि परिचालन खर्चासह अंदाजे १२ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. युद्धाच्या पहिल्या १०० तासांत हा खर्च अंदाजे ३.७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला. सेंटर फॉर अ न्यू अमेरिकन सिक्युरिटीनुसार, यूएसएस गेराल्ड आर. फोर्डसारख्या विमानवाहू जहाज स्ट्राइक ग्रुपच्या संचालनासाठी दररोज अंदाजे ६.५ दशलक्ष डॉलर्स खर्च येत आहे. काही दिवसांपूर्वी इराणमध्ये अमेरिकेचे F-15E विमान पडले. त्याच्या वैमानिकाच्या सुटकेसाठी ३०० दशलक्ष ते ५०० दशलक्ष डॉलर्स अमेरिकेने खर्च केले आहेत. या मोहिमेत अमेरिकेने आपलीच विमाने आणि हेलिकॉप्टर्स नष्ट केली आहेत. या सर्व खर्चाच्या आकड्यामुळे अमेरिकेत ओरड सुरू झाली आहे. मात्र असे असले, तरी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. कारण त्यांनी आता आपल्या पत्नीसाठी सर्वात महागडे विमान विकत घेण्याचा घाट घातला आहे.

ट्रम्प प्रशासनाने फर्स्ट लेडीच्या प्रवासासाठी वादग्रस्त ७० दशलक्ष डॉलर्सचे आलिशान बोईंग ७३७ मॅक्स ८ जेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे विमान निवडक कॅबिनेट सदस्यांना आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांना सुरक्षित प्रवासासाठी दिले जाणार आहे. ट्रम्प प्रशासन ७० दशलक्ष डॉलर्समध्ये ते थेट खरेदी करणार आहे. मेलानिया ट्रम्प यांना मिळणाऱ्या या ७० दशलक्ष डॉलर्सच्या जेटमध्ये अनेक सुविधा आहेत. यामध्ये एक क्वीन-साईज बेडरूम, एक खाजगी शॉवर, एक आलिशान बार, एक मोठी बेडरूम, चार मोठे फ्लॅट-स्क्रीन टीव्ही आणि आरामदायक आसनव्यवस्था यांचा समावेश आहे. ही बातमी बाहेर आल्यावर आता अनेकांनी मेलानिया यांच्या या खास विमानाचा विरोध सुरू केला आहे. या विमानाच्या खरेदीसाठी जो निधी आहे, तो निधी सीमा सुरक्षा आणि इमिग्रेशन अंमलबजावणीसाठी ठेवण्यात आला होता, मात्र तो आता मेलानिया यांच्या विमानासाठी वळवण्यात आल्याचा आरोप आहे.

अर्थात, या सर्व आरोपांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आणि मेलानिया यांच्या आलिशान राहणीमानावर कोणताही परिणाम झालेला नाही. मेलानिया यांना फर्स्ट लेडीला ज्या सुविधा मिळतात, त्यापेक्षा अधिक सुविधा मिळत असल्याची ओरड होत आहे. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी यांना व्हाईट हाऊसमध्ये निवास, अत्यंत सुरक्षित सिक्रेट सर्व्हिस संरक्षण आणि विशेष विमानांचा वापर करता येतो. या विमानांमध्ये एअर फोर्स, मरीन वन या विमानांचा समावेश असतो. असे असतानाही ७० दशलक्ष डॉलर्सचे विमान कशाला, हा प्रश्न विचारला जात आहे. मेलानिया या विमानाआधी त्यांच्या दौऱ्यांमध्ये होत असलेल्या अतिरिक्त खर्चामुळेही वादात सापडल्या आहेत.


this blog was originally published on https://gajawaja.in/first-lady-melania-trump/

Comments

Popular posts from this blog

वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

उष्माघाताची ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने करा ही 5 कामे