Amarnath : अमरनाथ यात्रेची तारीख जाहीर, जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया कशी असेल?
हिंदू धर्मामध्ये यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन देवदर्शन घेणे म्हणजेच यात्रा. चारधाम यात्रा हिंदू धर्मात सर्वात मोठी आणि पवित्र यात्रा मानली जाते. मात्र या यात्रेसोबतच अजून एक यात्रा अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि ती यात्रा म्हणजे, अमरनाथ यात्रा. हिंदू धर्मात अमरनाथ यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अमरनाथ यात्रेला जुलैमध्ये सुरुवात होणार आहे. बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी अनेक भक्त प्रतिक्षेत आहेत. अमरनाथ यात्रेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, यावर्षी यात्रा 3 जुलै ते 28 ऑगस्टपर्यंत चालेल. 57 दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी जम्मू येथील भगवती नगर बेस कॅम्पमधून पहिला जत्था रवाना होईल. यात्रेसाठी नोंदणी 15 एप्रिलपासून अर्थात आजपासून सुरू झाली आहे. एलजी सिन्हा यांनी यात्रेची माहिती देताना माध्यमांना सांगितले की, 13 ते 70 वयोगटातील लोक ही यात्रा करू शकतात. गुहेत पहिली पूजा 19 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला केली जाईल. यात्रेसाठी अनंतनाग येथून पारंपरिक 48 किमी लांबीचा नुनवान-पहलगाम मार्ग आणि गांदरबल येथून 14 किमी लांबीचा बालटाल मार्ग खुला राहील.
भाविकांना श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा देशभरातील 554 हून अधिक अधिकृत बँक शाखांमधून नोंदणी करता येणार आहे. जम्मू-काश्मीर बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक, यस बँक आणि ॲक्सिस बँक या बँकांच्या निवडक शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. नोंदणी ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ या तत्त्वावर होणार असून प्रत्येक मार्गासाठी दररोज ठराविक कोटा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहान प्रशासनाने केले आहे.
अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला सर्वात अगोदर श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाचे (SASB) संकेतस्थळ jksasb.nic.in ला भेट द्यावी लागेल. या यात्रेसाठी संबंधित सर्व कागदपत्रे डिजिटल अपलोड करावे लागतील. तुम्ही यात्रेचा स्लॉट पण अगोदरच बुक करू शकता. त्यानंतर यात्रा परमिट रजिस्ट्रेशनचे बटण दाबा. येथे तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल. यामध्ये यात्रेचा रस्ता, यात्रा तारीख, यात्रेविषयीची संपूर्ण माहिती आणि आरोग्यविषयक माहिती द्यावी लागेल. हे केल्यानंतर तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो, आयडी आणि मेडिकल सर्टिफिकेट यांची कॉपी अपलोड करावी लागेल. तुमच्यासमोर आता पेमेंटचा पर्याय येईल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही यात्रेचे परमिट डाऊनलोड करू शकता.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर भाविकांना यात्रा परवाना दिला जाईल. या परवान्यात प्रवासाची तारीख, निवडलेला मार्ग आणि प्रवेशाची वेळ नमूद असेल. याशिवाय, यंदा सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक यात्रेकरूस आरएफआयडी कार्ड देण्यात येणार आहे. हे कार्ड यात्रेदरम्यान सतत जवळ बाळगणे बंधनकारक असेल. याच्या मदतीने प्रशासनाला यात्रेकरूंचे रिअल-टाइम ट्रॅकिंग करता येणार आहे.
उंच डोंगररांगा आणि कठीण हवामान लक्षात घेता यात्रेसाठी कठोर आरोग्य नियम लागू करण्यात आले आहेत. 13 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्तींनाच यात्रेसाठी पात्रता असेल. सहा आठवड्यांपेक्षा अधिक दारोदार असलेल्या महिलांना यात्रेसाठी नोंदणी करता येणार नाही. तसेच सर्व यात्रेकरूंना 8 एप्रिल 2026 नंतर अधिकृत डॉक्टर किंवा वैद्यकीय संस्थेकडून जारी केलेले अनिवार्य आरोग्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल. आरोग्य तपासणी आणि वैध परवान्याशिवाय कोणत्याही यात्रेकरूला पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. ही तीर्थयात्रा पारंपारिक पहलगाम मार्ग आणि बालटाल मार्ग या दोन्ही मार्गांनी आयोजित केली जाईल. प्रशासनानं भाविकांची सुरक्षा, वैद्यकीय शिबिरं आणि निवासाची व्यवस्था अंतिम करण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. भाविकांना सोबत उबदार कपडे आणि आवश्यक औषधं बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
this blog was originally published on https://gajawaja.in/amarnath-yatra-2026-dates-announced-know-registration-process/
Comments
Post a Comment