Monkeys in China : चीनमध्ये सोन्यापेक्षा महाग माकड
चीनमध्ये होणाऱ्या संशोधनाबाबतचे रहस्य आता लपून राहिलेले नाही. चीनमध्ये अशा हजारो प्रयोगशाळा आहेत, ज्यामध्ये औषध आणि अन्य प्रकारची संशोधने होत असतात. या सर्वांचे प्रयोग सुरुवातीला प्राण्यांवर केले जातात. यासाठी चीनमध्ये कुत्रा, मांजर, ससा, गाढव, साप आणि माकड यांचा वापर करण्यात येतो. चीनमध्ये संशोधन आणि प्रयोगांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, आता तिथे चक्क माकडांची किंमत आभाळाला टेकली आहे. एका माकडासाठी या प्रयोगशाळा वीस लाखांहून अधिक रक्कम मोजत आहेत. यामुळे चीनमध्येच माकड पकडून देण्याची स्पर्धा लागली आहे. ही स्पर्धा एवढी तीव्र झाली आहे की आता चीनमधील माकडेही दुर्मिळ होऊ लागली आहेत. त्यामुळे आता चीनमधील प्रयोगशाळा अन्य देशांमधून माकडे मागवत आहेत. यामध्ये श्रीलंका आणि व्हिएतनामसारख्या देशांचा समावेश आहे.
चीनमध्ये औषधांच्या संशोधनात मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा वापर केला जातो. त्यामध्ये अलिकडच्या वर्षांत माकडांचा वापर वाढला आहे. यामुळे संशोधनात वापरल्या जाणाऱ्या माकडांना सोन्याच्या दरापेक्षाही अधिक दर देऊन खरेदी केले जात आहे. जवळपास २० लाखांपर्यंत किंमत एका माकडाला मिळत आहे. येथील एका संशोधनानुसार ही रक्कम गेल्या पाच वर्षांत दुप्पट झाली आहे. चीनमध्ये वैद्यकीय संशोधन, कर्करोग, कोविड आणि अन्य रोगांवरील लसींच्या चाचण्यांचे अनेक प्रयोग केले जातात. या लसीची तीव्रता आणि त्याचा परिणाम किती आहे, हे पाहण्यासाठी त्यांचा वापर प्रथम माकडांवर केला जातो. सुरुवातीला चीनमधील माकडांचा वापर केला जात होता, मात्र आता देशातील माकडेही चीनला कमी पडू लागली आहेत. त्यामुळे श्रीलंका आणि व्हिएतनाममधून मोठ्या प्रमाणात माकडे चीनमध्ये आणली जात आहेत. याला कारण आहे ते चीनमध्ये औषधांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात होणारे संशोधन. त्यामुळेच माकडांची किंमत लाखांच्या घरात गेली आहे. एका माकडासाठी येथील प्रयोगशाळा जेवढी रक्कम देतात, तेवढी रक्कम चीनमधील सरासरी वार्षिक पगारापेक्षा अधिक आहे.
यासंदर्भात चीनमधील एका संस्थेने एक पाहणी अहवाल सादर केला. त्यामध्ये चीनमधील प्रयोगशाळा वापरत असलेल्या प्राण्यांसाठी जेवढे पैसे मोजतात, त्याच्या निम्माही पगार येथील नोकरदारांना मिळत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालात माकड आणि सोन्याच्या किंमतीची तुलनाही करण्यात आली आहे. यात माकडांची किंमत लक्षणीयरीत्या वाढल्याचे उघड झाले आहे. चीनमध्ये गेल्या पाच वर्षांत औषध निर्माण कंपन्यांमध्येही वाढ झाली आहे. या सर्व कंपन्यांच्या आधुनिक प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये प्राण्यांसाठी स्वतंत्र विभाग आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी प्रयोगांसाठी ठेवले जातात. त्यातही माकडांची संख्या अधिक आहे. प्रयोगशाळांमध्ये तयार झालेल्या लसीचा डोस माकडांना देण्यात येतो. त्यानंतर या औषधामुळे त्यांच्या शरीरात काय बदल होतात, हे पाहिले जाते. संबंधित औषध कसे शोषले जाते, ते कसे विघटित होते आणि ते कसे उत्सर्जित होते याचे परीक्षण केले जाते
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध शांघाय इन्स्टिट्यूट ऑफ मटेरिया मेडिका यांनी ४५० सायनोमोल्गस मॅकाक माकडांसाठी ६२ दशलक्ष युआनची निविदा जारी केली. म्हणजेच प्रति माकड १८ लाखांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. यावरून चीनमध्ये किती मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे आणि त्यासाठी माकडांचा कसा वापर होतो, याची माहिती मिळते. अर्थात, ही फक्त एका प्रयोगशाळेची आकडेवारी आहे. अशा अनेक प्रयोगशाळा चीनमध्ये कार्यरत आहेत. त्यामध्ये वूशी अॅपटेककडे ३०,००० माकडे आहेत. जॉइन लॅबोरेटरीजकडे २५,००० माकडे आहेत, तर पेक्स लॅबोरेटरीजकडे २०,००० माकडे आहेत. अनेक वेळा औषधांच्या प्रयोगांमुळे या माकडांना आजार होतात, तर काही माकडांचा वेदनांमुळे मृत्यूही होतो. या सर्वांमध्ये चीनमधील माकडांची संख्या कमी होत चालल्याचाही धक्कादायक अहवाल समोर आला आहे. त्यामुळे चीनने श्रीलंकेकडून एक लाख माकडांची मागणी केली आहे. श्रीलंकेनेही चीनच्या या प्रस्तावाला मान्यता दिली असून त्याबदल्यात चीन श्रीलंकेला मोठी रक्कम देणार आहे. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात माकडे वाढली असून त्याचा शेतीला फटका बसत आहे. हीच माकडे चीनला पाठवली जाणार असल्याचे श्रीलंकेच्या कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे. या माकडांवरही चीनच्या प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळ्या औषधांचे प्रयोग होणार आहेत.
this blog was originally published on https://gajawaja.in/monkeys-in-china-for-medical-and-pharmaceutical-research/
Comments
Post a Comment