Rathyatra : भगवान जग्गनाथांच्या मोठ्या डोळ्यामागे आहे एक खास कारण

 सध्या जग्गनाथ पुरीमध्ये महाप्रभु जग्गनाथांचा रथोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात सुरु आहे. पुरी मंदिरापासून गुंडीच्या मंदिरापर्यंत जाते. हे मंदिर भगवान जग्गनाथच्या मावशीचे मंदिर असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात प्रभू काही दिवस थांबतात आणि नंतर थोड्या दिवसांनी पुन्हा आपल्या घरी परतात. या उत्सवात भगवान जगन्नाथ (श्रीकृष्ण), त्यांचे बंधू बलभद्र (बलराम) आणि बहीण सुभद्रा हे तीन स्वतंत्र रथांमध्ये विराजमान होऊन गुंडिचा मंदिरात जातात. हिंदू मान्यतेनुसार, तिन्ही रथांपैकी कोणत्याही एका रथाची दोरी हाताने ओढल्यास सर्व पापांचे निवारण होते आणि अश्वमेध यज्ञासारखे पुण्य प्राप्त होते. आपण जर पुरीच्या जग्गनाथ मंदिरातील महाप्रभूंची मूर्ती पाहिली तर आपल्याला ही मूर्ती जरा अपूर्ण वाटते आणि मूर्तीचे डोळे देखील मोठे आहेत. या दोन्ही गोष्टींमागे एक खास शास्त्र सांगितले जाते ते काय पाहूया. 

भगवान जगन्नाथांचे मोठे डोळे त्यांच्या सर्वज्ञता, ज्ञान, करुणा आणि दया यांचे प्रतीक मानले जातात. यातून भगवान सर्वकाही पाहतात. या मोठ्या डोळ्यांनी, जगन्नाथजी त्यांच्या भक्तांना आणि त्यांच्या भावनांना मनापासून पाहू शकतात आणि त्यांना भरभरुन आशीर्वादही देतात, असे सांगितले जाते. भगवान जगन्नाथांचे डोळे मोठे आणि पापण्या नसलेले असतात. हे त्यांच्या भक्तांप्रती अमर्याद प्रेम, करुणा आणि जागृतीचे प्रतीक आहे. मोठे डोळे दर्शवतात की देव सर्वज्ञ आहे, तो संपूर्ण विश्वावर सतत लक्ष ठेवून असतो आणि कधीही झोपत नाही. धार्मिक पौराणिक कथेनुसार, एक दिवस माता यशोदा या देवकी सोबत द्वारकेत आल्या होत्या. यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या राण्यांनी माता यशोदाला श्रीकृष्णाच्या बाललीलांच्या गोष्टी सांगण्याचा आग्रह केला होता. यावेळी तिथे श्रीकृष्णांची बहीण सुभद्रा देखील उपस्थिती होती.

माता यशोदा म्हणाल्या मी तुम्हाला कृष्णाच्या त्याच्या गोपिकांसोबतच्या लीला नक्की सांगीन मात्र या गोष्टी कृष्ण आणि बलरामच्या कानावर जाऊ देऊ नका. त्यामुळे सुभद्रा दरवाजावर जाऊन पहारा देऊ लागली. इकडे यशोदा माईने बाललीला सांगायला सुरुवात केली. सर्वजण त्या कथांमध्ये हरवून गेले. त्यावेळी तिथे बलराम आणि कृष्ण देखील आले मात्र सुभद्रा कथेमध्ये इतकी दंग झाली की तिला हे दोघे आल्याची भ्रांत राहिली नाही. बलराम आणि कृष्ण देखील आपल्या बाललीलांची कहाणी ऐकण्यात गुंग झाले आणि कथा ऐकता ऐकता तिघा भावा बहिणींचे डोळे प्रसन्नतेने मोठे होऊ लागले. इतक्यात तिथे नारदमुनी आले. त्यांनी कृष्णाचे हे मनमोहक रूप पाहिले व त्यांना विनंती केली तुमचे हे मोहक रूप भक्तांना देखील दाखवावे. मग श्रीकृष्ण म्हणाले कलियुगात मी याच रूपात जगन्नाथ येथे अवतरित होईल. तशीच मूर्ती आज जगन्नाथ मंदिरात स्थापित आहे. 

भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या मूर्तींना हात-पाय नसल्यामागील कथा अशी आहे. राजा इंद्रद्युम्नच्या आदेशानुसार विश्वकर्मा स्वतः भगवान जगन्नाथांच्या मूर्ती बनवत होते. परंतु त्यांनी एक अट घातली होती की मूर्तींचे काम पूर्ण होईपर्यंत कोणीही ती मूर्ती पाहू नये. खोलीत कोणीही प्रवेश करणार नाही. राजा इंद्रद्युम्नने त्यांची अट मान्य केली आणि मूर्तीचे काम सुरू झाले. काही दिवस खोलीतून मूर्ती बनवल्याचा आवाज येत राहिला परंतु काही दिवसांनी तो आवाज बंद झाला. त्यामुळे राजा इंद्रद्युम्नला वाटले की मूर्तीचे काम पूर्ण झाले आहे आणि तो खोलीत शिरला. त्यानंतर विश्वकर्माजींना राग आला आणि त्यांनी त्या मूर्ती अपूर्ण ठेवल्या. यामुळे मंदिरात अधुऱ्या असलेल्या मूर्तींची स्थापना करण्यात आली. 

this blog was originally published on https://gajawaja.in/know-why-are-lord-jagannaths-eyes-big/



Comments

Popular posts from this blog

Health : कॅन्सर होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

North Korea : नो आईस्क्रीम…नो हॅम्बर्गर !