Lord Vitthal : भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात अवतरले तरी कसे?
वर्षभरातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची एकादशी म्हणजे, आषाढी एकादशी. आषाढ महिन्यात येणारी ही एकादशी म्हणजे, पंढरपूरची वारी. आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी हे समीकरण मागील अनेक दशकांपासून चालत आले आहे. वारीला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर येथे वास्तव करणारा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. पांडुरंग म्हणजे खुद्द भगवान कृष्ण. दर आषाढी एकादशीला येथे वैष्णवांचा मेळा भरतो आणि आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोकं पंढरपूरमध्ये जमतात. हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून हे सर्व वारकरी एकादशीला आपल्या देवाचे दर्शन घेतात. मात्र पंढरपूरमध्ये विठ्ठल आले कसे याबद्दल एक कथा सांगितली जाते. आई-वडिलांच्या निस्सीम सेवेमुळे पुंडलिकाच्या भेटीसाठी खुद्द भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या पंढरपुरात आले. मात्र आई वडिलांच्या सेवेमध्ये व्यस्त असलेल्या पुंडलिकाने देवाला मी आईवडिलांची सेवा करून झाली की येतो असे सांगून त्यांना उभे राहण्यासाठी एक विट दिली. याच विटेवर देव अजूनही उभा आहे.
याची कथा म्हणजे, सहाव्या शतकामध्ये महाराष्ट्रातील पंढरपूर येथे पुंडलिक नावाचा एक भक्त जन्मला. पुंडलिकांची आपल्या आई वडिलांवर आणि आपले आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण यांच्यावर असीम भक्ती होती. भक्त पुंडलिक हा एक अतिशय साधा, गोड आणि मनमिळावू व्यक्ती होता आणि भगवान श्रीकृष्णांना त्यांचा स्वभाव खूप आवडत असे. पण पुंडलिकाचे त्याच्या पत्नीवर फार प्रेम होते. निव्वळ प्रेम नव्हे तर अंध प्रेम! या प्रेमात बुडालेला पुंडलिक त्याच्या आई बाबांकडेही दुर्लक्ष करत असे. पुंडलिकाला देवभक्तीची फार आवड होती. एकदा काशीला मोक्ष प्राप्तीसाठी जात असताना तो वाट चुकला आणि एका आश्रमात येऊन पोहचला. तिथल्या ऋषींना त्याने विचारले की काशीला जाणारी वाट दाखवावी. ऋषींनी त्याला ती वाट ठाऊक नसल्याचे सांगून ते कधीही काशीला गेले नाहीत असे कारण सांगितले. पुंडलिकाला हसू आवरले नाही. त्याने हसता-हसता ऋषींना सांगितले की ‘तुम्ही एक ऋषी असून तुम्ही कधी काशीला गेला नाहीत. मग तुम्ही कसले ऋषी.” असे म्हणत तो त्याच्या वाटेला लागला.
आश्रमापासून थोड्या अंतरावर जाताच त्याला आश्रमाकडून काही महिलेच्या हसण्याचा आवाज आला. पुंडलिक पुन्हा मागे वळला. आश्रमात जाऊन पाहतो तर काय? तिथे तीन स्त्रिया आश्रमाला स्वच्छ करत होत्या. त्या स्त्रिया.. दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून स्वतः गंगा, यमुना आणि सरस्वती होत्या. ‘काशीला न जाता, या ऋषींच्या आश्रमात आणि भाग्यात इतके पावित्र आले तरी कुठून?’ असा सवाल त्यांनी केला. तेव्हा त्या मातांनी त्याला उत्तर दिले की,” या ऋषींनी आयुष्यभर त्यांच्या मात्या पित्याची सेवा केली. त्यांची निस्सीम भक्ती केली. त्यामुळे त्यांच्या पदरात हे पावित्र आले आहे. मोक्ष मिळवण्यासाठी कुण्या धार्मिक स्थळी जाण्यापेक्षा व्यक्तीचे कर्म महत्वाचे असतात.”
हे बोल ऐकून, पुंडलिकाचे डोळे उघडले. त्याला त्याच्या आईवडिलांची काशी ला नेण्याची विनंती आठवली. पुंडलिक तसाच मागे फिरला आणि घराकडे गेला. आई वडिलांनी सोबत घेऊन त्याने त्यांना काशीचे दर्शन घडवले. आई वडिलांची निस्सीम भक्ती केली. या भक्तीला पाहून स्वतः देवालाही राहवले नाही. स्वतः भगवान श्री कृष्ण पुंडलिकाच्या भेटीसाठी आले. तेव्हा पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत रमला होता. त्याने वळून पाहिले तर मागे साक्षात भगवान श्री कृष्ण उभे होते. पण पुंडलिक तेव्हा आई वडिलांच्या सेवेत तल्लीन असल्याने त्याने देवालाही प्रतीक्षा करायला सांगितले. देवाला वीट दिली आणि त्याला त्यावर काही काळ विराजमान होण्यासाठी सांगितले.
सेवा संपन्न झाल्यावर त्याने देवाची माफी मागितली. पण देव पुंडलिकाची मातृ पितृ भक्ती पाहून प्रसन्न झाला होता. या प्रसन्नतेने देवाने त्याला वरदान मागण्यास सांगितले. पुंडलिकाने देवाला प्रतीक्षा करायला लावल्याने तो दुखावला होता, पण देव त्याला निसंकोचपणे वरदान मागण्यास सांगतो. तेव्हा पुंडलिक भगवान श्री कृष्ण यांना ‘भक्तांची काळजी करण्यासाठी पृथ्वीवर स्थायिक होण्यास सांगतो.” तेव्हा विटेवर उभा असणारा भगवान विठ्ठल जिथे स्थायिक होतो ते ठिकाण म्हणजे आजचे पंढरपूर! मुळात, पंढरपूरमध्ये स्थित असलेली श्री विठ्ठलांची मूर्ती स्वयंभू आहे. कोणत्याही शिल्पकाराने त्याला घडवले नाही.
this blog was originally published on https://gajawaja.in/ashadhi-ekadshi-2026-how-vitthal-arrived-in-pandharpur/
Comments
Post a Comment