Operation Tiger: अगा जे कधी घडलेची नाही??

 सध्या देशाच्या तसेच राज्याच्या पातळीवर ‘पक्षांतर’ हा विषय एकदम ‘हॉट’ झाला आहे. सगळी माध्यमे यावरच काथ्याकुट करत आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षात पडलेली फूट आणि उद्धव सेनेत होऊ घातलेली ‘गद्दारी’ या दोन प्रमुख घटनांचा उहापोह करताना सर्वच विश्लेषकांनी असा ‘आव’ आणला आहे की हे सर्व काही नवीन आहे आणि पूर्वी असे कधीच घडत नव्हते. हे सर्व जण भाजपने ही नवीनच संस्कृती रुजवली असा आरोप करत आहेत. या सर्वाना ‘कान खोलके सुन लो ‘ म्हणताना अगदी रामायण काळापासून ते आधुनिक काळापर्यंत घडलेल्या काही प्रमुख घटनांची आठवण करून देणे क्रमप्राप्त ठरते. 

रामायणातील वाली सुग्रीव संघर्ष सर्वाना माहित आहे. प्रभू रामचंद्रानी वालीचा वध केला. मरण्याआधी वालीने आपला पुत्र अंगद याला रामाच्या हवाली केले. वास्तविक त्यावेळी वालीचा रावणाशी मैत्री करार होता. तर्कदृष्ट्या वालीने अंगदला रावणाच्या स्वाधीन करायला हवे होते. पण तसे झाले नाही. पुढे रामाने अंगदला हा वानर सेनेचा सेनापती बनवले. रावणाचा ‘सद्वर्तनी’ भाऊ विभीषण हा रामाच्या पक्षाला जाऊन मिळाला. विभीषणामुळे रामाला रावणाचा पराभव करणे सुकर झाले. रावणाचा वध केल्यावर रामाने विभीषणाला लंकेचा राजा बनवले. महाभारतात १४ दिवसांचे महायुद्ध सुरु होण्यापूर्वी पांडव आणि कौरवानी दोन्ही पक्षातील लोकांना ‘पक्षांतर’ करण्याची एक संधी दिली होती. त्यावेळी १०० कौरवांपैकी एक भाऊ ‘युयूत्सु ‘ हा पांडवाना जाऊन मिळाला. बाजी प्रभू देशपांडे यांचे नाव ‘स्वामीनिष्ठ’ म्हणून इतिहासात अजरामर आहे. हेच बाजी प्रभू शिवाजी महाराजांविरुद्ध लढले होते. त्या लढाईत त्यांच्या शौर्यावर खुश होऊन महाराजांनी त्यांना आपल्या बाजूला वळवले.

नेताजी पालकर हे ‘प्रति शिवाजी’ म्हणून ओळखले जायचे. शिवाजी महाराजांनी त्यांचे सरसेनापती पद काढून घेतल्यावर ते प्रचंड चिडले आणि थेट औरंगजेबला जाऊन मिळाले. नंतर ते ‘स्वगृही’ शिवाजी राजांकडे परत आले. खुद्द संभाजी राजे सुद्धा काही काळ औरंगजेबला जाऊन मिळाल्याचा केळुस्करांच्या शिवचरित्रात उल्लेख आहे. पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या तोफखाना दलाचा प्रमुख इब्राहिम गारदी हा सुद्धा आधी पेशव्यांच्या विरुद्ध लढला होता. 

आता आपण भारताच्या अर्वाचिन इतिहासाकडे वळू या. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे काही वर्षें काँग्रेस पक्षात होते त्यावेळी ते कट्टर गांधीवादी होते. तेच अत्रे कालांतराने सावरकरांचे प्रशंसक झाले आणि काँग्रेसचे कडवट टीकाकार बनले. नेताजी सुभाषचंद्र बोस हे सुद्धा आधी काँग्रेसचे निष्ठावान नेते होते. पण गांधी नेहरुंशी मतभेद झाल्यावर त्यांनी आपली वेगळी वाट चोखाळली. एवढेच कशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे संस्थापक हेडगेवार हे सुद्धा काही वेळ काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला होता असे त्यांचे चरित्रकार सांगतात. जयप्रकाश नारायण, जे. बी. कृपलानी, मोरारजी देसाई इत्यादी नेते कित्येक वर्षें काँग्रेस पक्षात होते. पण आज त्यांची ओळख आहे ती काँग्रेस विरोधक म्हणून. अशोक मेहता, एस एम जोशी वगैरे समाजवादी मूळ काँग्रेसचेच होते. पण स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपली समाजवादी पक्षाची वेगळी चूल मांडली. कालांतराने अशोक मेहतानी काँग्रेसमध्ये पुनरागमन केले.

विजया राजे शिंदे या मूळच्या काँग्रेसी. नेहरुंशी मतभेद झाल्यावर त्यांनी तत्कालीन जनसंघात प्रवेश केला. त्यांचे चिरंजीव माधवराव शिंदे हे जनसंघांचे खासदार होते. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी आयकर खात्याची धाड टाकण्याची धमकी दिल्यावर ते काँग्रेसमध्ये सामील झाले. माधवरावांचे सुपुत्र ज्योतीरादित्य शिंदे हे तर UPAच्या काळात केंद्रीय मंत्री होते. त्यांनी २०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. १९६९मध्ये काँग्रेस पक्षात पहिली फूट पडली तेव्हा रामसुभग सिंग हे काँग्रेस (ओ) पक्षातर्फे लोकसभेतील पहिले विरोधी पक्ष नेते होते. तेसुद्धा यथावकाश इंदिरा गांधींच्या पक्षात सामील झाले. तारकेश्वरी सिन्हा या फायर ब्रँड नेत्या इंदिराजींच्या कट्टर टीकाकार होत्या पण नंतर त्याही इंदिराजींच्या वळचणीला जाऊन बसल्या. आणीबाणी उठल्यावर जगजीवन राम हे काँग्रेसमधून बाहेर पडून जनता पक्षात आले होते. १९८० नंतर तेही परत स्वगृही परतले. 

यशवंतराव चव्हाण यांनी १९७७ मध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यावर इंदिराजीपासून फारकत घेतली व ते रेड्डी काँग्रेसमध्ये सामील झाले. १९८० मध्ये इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरगामन झाल्यावर, प्रवाहाबरोबर राहण्याचे निमित्त करून यशवंतराव इंदिराजींच्या काँग्रेसमध्ये परतले. या वेळी इंदिरा गांधी यांनी यशवंतरावांचा पदोपदी किती अपमान केला त्याच्या अनेक कथा आजही चर्चील्या जातात. १९८० मध्ये भजनलाल हरियाणातील अक्खा जनता पक्ष घेऊन एका रात्रीत काँग्रेसमध्ये सामील झाले हा इतिहास तर कोणी विसरणार नाही.

शरद पवार हे तर वर उल्लेख केलेल्या वस्तादांचे वस्ताद निघाले. १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खूपसून मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आपला काँग्रेस (समांतर) हा पक्ष स्थापन केला. त्यावेळी त्यांनी आपला आमदारकीचा राजीनामा तर दिला नाहीच पण विरोधी पक्षांच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळवले. १९८५ मध्ये आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करताना सुद्धा त्यांनी आमदारपदाचा राजीनामा दिला नव्हता. (त्यावेळी पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात नव्हता त्याचा फायदा त्यांनी घेतला). २०१९ मध्ये आपल्याला जनतेने विरोधी पक्षात बसायचा आदेश दिला आहे असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंना पुढे करत महाराष्ट्रातील सत्ता काबीज केली. आता त्याच राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि त्यांचे मीडियामधील ‘भाट’ मानभावीपणे म्हणत आहेत की जे लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत ते जनादेशाचा अनादर करत आहेत. ‘भाजप’ मध्ये प्रवेश केल्यावर या नेत्यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. 

नुकतेच तामिळ नाडू मध्ये काँग्रेसने द्रमुक बरोबर युती करून निवडणूक लढवली आणि निकालानंतर विजयला पाठिंबा देऊन मंत्रिपदे मिळवली. याबद्दल जनादेशाचा अनादर झाला वगैरे कोल्हे कुई कोणीही करत नाही. हे यांचे दुहेरी मापदंड. आता अमित शाह जे राजकारण करत आहेत ते काही नवीन नाही हे वरील विवेचनावरून लक्षात येईल. त्यांच्याविरुद्ध गरळ ओकणारे एक तर आपल्या इतिहासाबद्दल अनभिज्ञ् आहेत किंवा ते वेड पांघरून पेडगावला जात आहेत असे म्हणावे लागेल. शाह जे करत आहेत ते ‘अगा कधी घडलेची नाही’ हा भ्रम पसरवण्याचा पद्धतशीर प्रयत्न इको सिस्टिम करत आहे त्यांचे ‘डोळे उघडवण्याचा’ हा एक छोटा प्रयत्न !

– रघुनंदन भागवत

this blog was originally published on https://gajawaja.in/something-that-has-never-happened-before/

Comments

Popular posts from this blog

Health : कॅन्सर होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

मेघा धाडे जान्हवीवर संतापली