Adhik Mahina : अधिकमास केव्हा सुरु होणार? काय आहे या महिन्याचे महत्त्व?

 आज वैशाख अमावस्या असून, उद्यापासून अधिक महिना सुरु होत आहे. हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला अत्यंत महत्त्व आहे. याच महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना देखील म्हणतात. या महिन्याला अतिशय शुभ मानले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार दर अडीच ते तीन वर्षांनी चंद्र आणि सौर वर्षातील काळाचा ताळमेळ बसवण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त अशा तेराव्या महिन्याला अधिक मास असे म्हणतात. साधारणपणे दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो. वर्षात १२ महिने असतात मात्र खगोलीय कारणांमुळे सौर वर्ष जे ३६५ दिवसांचे असते आणि चंद्र वर्ष जे ३५४ दिवसांचे असते यातील ११ दिवसांचा फरक दरवर्षी येतो. सलग तीन वर्षे हा फरक ३३ दिवसांचा म्हणजेच संपूर्ण एक महिन्याचा असतो. त्यामुळे दर तीन वर्षांनी अधिकमास येतो. अधिकमास आल्यामुळे पंचांगावर परिणाम होऊन वर्षातील सर्व सण काही दिवसांसाठी पुढे जातात. हा महिना जवळपास ३० ते ३३ दिवसांचा असल्याने वर्षातील महिने १३ होतात. यामुळे ज्येष्ठ महिना दोनदा गणला जातो. 

यंदा अधिक महिन्याची सुरुवात यंदा 17 मे 2026 रोजी होईल आणि 15 जून 2026 रोजी त्याचा समारोप होईल. याचा अर्थ असा आहे की, 2026 मध्ये दोन ज्येष्ठ महिने असणार आहेत एक असेल नियमित येणारा तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ महिना. अधिकमास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित केलेला आहे. या महिन्यात विष्णूंची भक्ती,उपासना पूजा व्रत याला अत्यंत महत्व आहे. मान्यतेनुसार जी व्यक्ती अधिकमासात पूर्ण महिना सात्विक भोजन करतो भगवान विष्णूंची आराधना करतो त्यावर कायम विष्णू कृपा असते. तसेच या महिन्यात दान करण्याला देखील महत्त्व आहे. 

अधिक महिन्यालाच मल मास देखील म्हटले गेले आहे. याचे कारण म्हणजे धार्मिक कार्यासाठी हा महिना वर्ज्य मानत असल्याने याला मल मास असे म्हणतात. तर यालाच पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात. विष्णूंनी या महिन्याला आपले नाव दिल्याने या काळात विष्णूंची उपासना केली जाते. वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनंतर म्हणजे साधारण 33 महिन्यांनंतर येत असतो. या 33 महिन्यांसाठी म्हणून 33 वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. याचा उल्लेख अनेकदा तीस – तीन असा करण्यात येतो. त्यामागील कारण म्हणजे 30 दिवसांचा हाच हा पण महिना असतो. या काळात काही लोक महिन्याभराचे व्रत देखील करतात. जर तुम्ही कथा वाचनाचे व्रत करत असाल तर शेवटचे तीन दिवस दिवसातून 2 वेळा करून हे पुढील 3 दिवस भरून काढावे. 33 ही संख्या अधिकमासामध्ये महत्त्वाची मानली जाते कारण आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देव असतात. 

अधिक महिन्यात या दिवसात जावयाला घरी बोलवून त्याला दीपदान करण्याची पद्धत आहे. चांदी किंवा तांबे असे कोणत्याही धातूच्या दिव्याचे या दिवसात दान केले जाते. या महिन्यात पूजा पाठ व भगवान विष्णूंची भक्ती करणे श्रेष्ठ मानले असल्याने सात्विक आहारावर भर देणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. काहीजण संपूर्ण अधिकमास व्रत करून केवळ फळे खातात. यामुळे पचनशक्ती सुधारते व शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीस स्वच्छ होते हे देखील महत्वपूर्ण कारण आहे. अधिकमासात मांसाहार करणे टाळावे. जमेल तितके शुद्ध अन्न ग्रहण करावे. केवळ शरीर नाही तर मनाची शुद्धी देखील करावी. आपल्या वागण्या बोलण्यात संयम आणि मधुरता असावी. मनात द्वेष, राग ठेवू नये. 

अधिकमास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असला तरी देखील या महिन्यात काही मंगलकार्ये करण्यास मनाई आहे. कोणतेही शुभकार्य अधिकमासात केले जात नाही. या महिन्यात लग्न,मुंज,वास्तुशांती किंवा कोणतेही चांगले कार्य करणे टाळावे असे सांगितले जाते. अधिकमासात नवीन गोष्टींची सुरुवात केली जात नाही. कोणतीही शुभ वस्तू खरेदी केली जात नाही. या महिन्यात केवळ भगवान विष्णूंची पूजा, आराधना करावी. निरंतर विष्णूंच्या नामाचा जप करणे लाभदायक मानले जाते. 

this blog was originally published on https://gajawaja.in/adhik-maas-2026-date-importance-and-full-information/


Comments

Popular posts from this blog

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?

उष्माघाताची ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने करा ही 5 कामे