AIMIM in Maharashtra : एम.आय.एम. धोकादायक की धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरलेले पक्ष…?
नुकत्याच महाराष्ट्रात संपन्न झालेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणूक निकालाची तीन वैशिष्ट्ये सांगता येतील. एक म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय, दुसरं म्हणजे एम.आय.एम. पक्षाने मारलेली मुसंडी, तिसरं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला १९ महानगरपालिकात मिळालेल्या ‘शून्य ‘ जागा. हे तीनही निकाल म्हटले तर स्वतंत्र आहेत आणि म्हटले तर एकाशी एक संबंधित आहेत. भाजपाने आता उघड उघड हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे आणि त्याबद्दल त्यांच्या मनात कुठलाही अपराधीपणा नाही. भाजपच्या या नीतीमुळे हिंदू भाजपच्या झेंड्याखाली एक होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. भाजपच्या हिंदुत्वाची प्रतिक्रिया म्हणून मुसलमान एम.आय.एम. प्रमुख असदुद्दीन ओवेसींच्या मागे एकवटू लागले आहेत किंवा ओवेसींना उत्तर म्हणून हिंदूंचे ध्रुवीकरण भाजपच्या झेंड्याखाली होऊ लागले आहे असेही म्हणता येईल. याच निवडणुकीत पहायला मिळालं की, राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षावरून मुसलमानांचा विश्वास आता उडू लागला आहे, कारण त्यांनी मतांसाठी मुसलमानांचा वापर केला, हे या समाजाच्या लक्षात आले आहे. एम. आय. एम. पक्षाला २९ पैकी २५ महानगरपालिकात मिळून १२५ जागा मिळाल्या आहेत. छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर येथे एम. आय. एम. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयाला आला आहे.
एम. आय. एम. च्या या धडाक्यामुळे अनेक विचारवंत, विश्लेषक धोक्याची घंटा वाजली असल्याचा इशारा देत आहेत. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाचे मूळ हे निजामाच्या हैदराबाद संस्थांनातील ‘रझाकार’ या ‘ चळवळीत आहे. या रझाकारांनी हिंदूवर केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या सर्वश्रुत आहेत. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सल्लाउद्दीन ओवेसी हे पूर्वी हैदराबादमधून लोकसभेवर निवडून जात असत. त्यांच्या निधनानंतर असदुद्दीन यांनी त्यांची जागा घेतली. विशेष म्हणजे एम.आय.एम. हा तेलंगणा राज्यातील एकमेव हैदराबाद मतदारसंघातून वर्षानुवर्षे निवडून येत आहे. त्याव्यतिरिक्त तेलंगणातील इतर कुठल्याही मतदारसंघातून ते आजपर्यंत निवडून आलेले नाहीत. एकदा टी.व्ही. वरील चर्चेत सुब्रमण्यम स्वामी यांनी ओवेसीना त्यांची मुळे हिंदू असल्याचे सांगताना त्यांच्या कुळाच्या मूळपुरुषाचे नाव ‘तुलसी राम’ असल्याची आठवण करून दिली होती. म्हणजेच काश्मीर मधील अब्दुल्ला कुटुंबियांप्रमाणे ओवेसी हे सुद्धा ‘धर्मांतरित मुस्लिम’ आहेत. आता ओवेसी यांच्या पक्षाच्या विस्तारामुळे अनेकजण भयभीत झाले आहेत कारण ओवेसी उघडपणे मुस्लिम धर्मांधतेचा करत असलेला पुरस्कार ! यामध्ये असदुद्दिन यांचे बंधू अकबराउद्दीन यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. यातून एक प्रश्न असा निर्माण होतो की सध्या भारतात ओवेसी हे एकमेव असे पुढारी आहेत का?
Comments
Post a Comment