Cooler : थंड हवेसाठी तुम्ही देखील कुलर वापरता? मग ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

 उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून, जगातील टॉप 100 उष्ण शहरांपैकी जवळपास 95 उष्ण शहरं केवळ भारतातील आहेत. सध्या भारत आणि भारतातील काही राज्यं उष्णतेच्या मोठ्या लाटेला सामोरे जात आहे. यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रातील विदर्भ भागातील सर्वच शहरं उष्णतेच्या लाटेमधे होरपळून निघत आहे. या अशा प्रखर उन्हामध्ये सगळ्यांच्याच अंगाची लाही लाही होत असल्याने फॅनची हवा देखील अपुरी पडत आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये आता कुलर घेण्याची चर्चा होत आहे. मात्र बाजारात कुलरचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने नक्की कोणता कुलर घ्यावा आणि कसा घ्यावा असा प्रश्न अनेकांना पडत आहे. कुलरचे अनेक पर्याय पाहून लोकांच्या मनात मोठा संभ्रम देखील निर्माण होत आहे. पण तुमचा हाच गोंधळ दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला कुलर घेण्यासाठी काही उपयुक्त टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही नक्कीच योग्य तो कुलर तुमच्यासाठी निवडू शकता. जाणून घेऊया याबद्दल. 

आता दुकानात गेल्यानंतर आपल्याला मेटल आणि प्लास्टिक अशा दोन प्रकारची कुलर पाहायला मिळतात. सुरुवात येथूनच होते की, कुलर मेटलचा घ्यावा की, प्लास्टिकचा. आता दोन्ही कुलरचे फायदे आणि तोटे वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीने कुलर निवडू शकता. प्लास्टिक एअर कूलर हलके असतात आणि सहजपणे हलवता येतात. ज्यामुळे ते घराच्या किंवा ऑफिसच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वापरण्यासाठी सर्वोत्तम बनतात. तसेच, प्लास्टिक बॉडीमुळे, विजेचा धक्का लागण्याचा धोका देखील कमी असतो. मेटलच्या एअर कूलरच्या तुलनेत प्लास्टिकचे कुलर अधिक किफायतशीर असतात. डिझाइन, रंग आणि आकारानुसार प्लास्टिक एअर कूलर अनेक ऑप्शनमध्ये उपलब्ध आहेत. 

तर दुसरीकडे जर तुम्हाला जास्त कूलिंगची आवश्यकता असेल तर मेटल एअर कूलर हा एक उत्तम पर्याय आहे. हे प्लास्टिक एअर कूलरपेक्षा निश्चितच महाग आहेत, परंतु त्यांचे अनेक फायदे आहेत. धातूच्या कूलरमध्ये अधिक मजबूत मोटर आणि पंखा असतो, जो जास्त हवा फेकतो. प्लास्टिकच्या कूलरपेक्षा धातूचे एअर कूलर अधिक टिकाऊ असतात. दोन्ही प्रकारचे कूलर चांगले आहेत, परंतु अधिक कूलिंगसाठी तुम्ही धातू किंवा लोखंडी बॉडी असलेला कूलर निवडावा. लोखंडी भिंतींना जोडलेल्या पॅडवर पाणी पडल्याने, लोखंड लवकर थंड होते आणि बाहेरील बरीच उष्णता अडकवते. पाण्याचा ट्रे देखील थंड होतो आणि थंड पाण्याच्या प्रवाहामुळे हे कूलर फास्ट आणि अधिक थंड होऊ लागते. कूलर सावलीत ठेवला तर तो आणखी थंड होईल. याउलट, प्लास्टिक कूलरचे शरीर सामान्य तापमानावर राहते आणि ते लवकर थंड होत नाही. 

कूलर हे 3-ब्लेड आणि 5-ब्लेड अशा दोन प्रकारचे असतात. 3-ब्लेड आणि 5-ब्लेड कूलरमधील महत्त्वाचा फरक म्हणजे, या दोघांमध्ये असलेली हवा फेकण्याची पद्धत. तुम्हाला लांब अंतरापर्यंत जोरात थंड हवा हवी असेल तर 3-ब्लेड कूलर अधिक उपयुक्त ठरतो. याउलट शांत आणि सतत समान पद्धतीने हवा हवी असेल तर 5-ब्लेड कूलर चांगला पर्याय आहे. ५-ब्लेडचा कुलर हा कमी आवाजात संपूर्ण खोलीत समान थंडावा देतो. पण कूलर खिडकीजवळ किंवा खोलीच्या कोपऱ्यात ठेवून संपूर्ण घरात हवा पोहोचवायची असेल, तर 3-ब्लेड कूलर अधिक चांगला ठरू शकतो. 3-ब्लेड कूलरमध्ये ब्लेड कमी असल्याने मोटर वेगाने फिरते आणि हवा जास्त ताकदीने दूरपर्यंत फेकली जाते. त्यामुळं मोठ्या रूम, हॉल किंवा मोठ्या जागेसाठी हा कूलर अधिक उपयोगी ठरतो.

5-ब्लेड कूलरमध्ये ब्लेड जास्त असल्याने हवा छोटे-छोटे प्रवाह बनवून बाहेर येते. त्यामुळे हवा स्मूद आणि सतत मिळते. यामुळं दीर्घकाळ अधिक आरामदायक थंडावा मिळतो. बेडरूमसाठी हा पर्याय योग्य मानला जातो. दोन्ही प्रकारच्या कूलरमध्ये वीज वापर साधारण सारखाच असतो. मात्र 3-ब्लेड कूलरमध्ये ब्लेड कमी असल्यामुळे मोटरवर कमी ताण येतो, त्यामुळे तो थोडा अधिक एफिशिएंट ठरू शकतो. 

जर तुमच्याकडे कुलर असेल आणि तो थंड हवा देत नसेल तर तुम्ही काही छोट्या छोट्या टिप्स वापरून पुन्हा कुलरची थंड हवा घेऊ शकता. यासाठी घाण किंवा गंजलेली जाळी आणि पॅड्स हवा वाया घालवतात. दर १-२ आठवड्यांनी त्यांना पाण्याने स्वच्छ करा. पॅड्सची सफाई केली तर हवा सहजपणे थंड होईल आणि कूलरची कार्यक्षमता सुधारेल. शिवाय कूलरच्या टाकीमध्ये थंड पाणी आणि बर्फ टाका. गरम पाणी वापरणं कधीही टाळा, कारण त्यामुळे पॅड्सवरून पाणी थंड होण्यास वेळ लागतो आणि कूलर गरम हवा फेकतो. थंड पाणी आणि बर्फ वापरणं कूलरच्या कार्यक्षमतेला झपाट्यानं वाढवते. 

कूलर ताजी हवा मिळवण्यासाठी खिडकीजवळ किंवा मोकळ्या जागेत ठेवा. बंद खोलीत कूलरला हवा मिळत नाही, ज्यामुळे हवा कमी होण्याची शक्यता असते. खिडकीजवळ ठेवल्यास हवा दुरुस्तपणे सर्क्युलेट होईल आणि कूलर जास्त प्रभावी होईल. कूलरची थंड हवा चांगली पसरवण्यासाठी पंखा वापरणे फार उपयुक्त आहे. पंख्यामुळे हवेचा प्रवाह वाढतो आणि खोली लवकर थंड होते. पण पंखा खूप वेगाने चालवू नका, यामुळे थंड हवा कमी होईल. मध्यम वेगाचा पंखा वापरणं सर्वोत्तम ठरेल. कूलरची मोटर किंवा पंप योग्यरित्या काम करत नसल्यास, थंड हवा येणं थांबते. पंप तपासा आणि त्याचा कार्यप्रदर्शन सुनिश्चित करा. जर पंप बिघडला असेल, तर तो बदलवा किंवा दुरुस्त करा. तसेच, मोटरच्या कार्यक्षमतेची तपासणी करा. उच्च दर्जाचे कूलिंग पॅड्स वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 

तुम्ही कुलर वापरत असाल तर कुलरच्या पाण्यामध्ये तुरटी टाका. कुलरमध्ये तुरटी टाकण्याचे काही खास कारणं आहेत. तुरटी पाण्यातील धूळ, माती आणि सूक्ष्म कणांना एकत्र करून खाली बसवण्याचे काम करते. त्यामुळे पाणी स्वच्छ आणि पारदर्शक राहते. हे एक प्रकारचे नैसर्गिक शुद्धीकरण आहे, जे पाण्यातील अशुद्धता कमी करते. त्यामुळे कुलरच्या टाकीतील पाणी अधिक काळ स्वच्छ राहते आणि दुर्गंधी निर्माण होत नाही. उन्हाळ्यात पाण्यात जीवाणू झपाट्याने वाढतात. यामुळे पाण्यातून सडका वास येऊ लागतो. तुरटी पाण्याचा pH संतुलित ठेवण्यास मदत करते आणि जीवाणूंची वाढ कमी करते. परिणामी, कुलरचे पाणी जास्त काळ ताजे राहते आणि दुर्गंधी कमी होते. काही भागांमध्ये खारे पाणी वापरले जाते. 

अशा पाण्यामुळे कुलरच्या पॅड्स आणि पंख्यावर पांढऱ्या मिठाचा थर जमा होते, ज्यामुळे कुलरची कार्यक्षमता कमी होते. तुरटी खारेपण पूर्णपणे कमी करत नसली तरी पाण्यातील क्षार कण खाली बसवण्यास मदत करते, ज्यामुळे कुलरचे भाग जास्त काळ टिकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कुलरमध्ये मच्छरांची वाढ रोखण्यातही तुरटी उपयुक्त ठरते. साचलेल्या पाण्यात मच्छर अंडी घालतात आणि त्यांची वाढ होते. पण तुरटी टाकल्यास पाणी स्वच्छ राहते आणि मच्छरांची पैदास कमी होते. त्यामुळे मच्छरांच्या त्रासापासून मोठा दिलासा मिळतो.

लक्षात ठेवा
कूलर कधीही बंद खोलीत चालवू नका. कूलर खिडकीत किंवा दरवाजाच्या जवळ असावा, जेणेकरून तो बाहेरची ताजी हवा आत घेईल. तसेच, समोरची दुसरी खिडकी किंवा दरवाजा थोडा उघडा ठेवा, जेणेकरून गरम हवा बाहेर जाईल. यामुळे ‘दमटपणा’ होत नाही. कूलरचा फॅन सुरू करण्याच्या 5-10 मिनिटे आधी फक्त ‘पंप’ चालू करा. यामुळे आतील घास पूर्णपणे ओले होतील आणि फॅन सुरू करताच पहिल्या सेकंदापासून थंड हवा मिळेल. जुन्या लाकडी धाग्यांच्या गवतापेक्षा ‘हनीकॉम्ब पॅड्स’ जास्त काळ पाणी धरून ठेवतात. ते स्वच्छ करणे सोपे असते आणि त्यातून जास्त थंडावा मिळतो. अति उष्णतेच्या वेळी कूलरच्या पाण्याच्या टाकीत थोडे बर्फाचे खडे टाका. यामुळे पाणी अधिक थंड होते आणि हवा अधिक सुखद वाटते. पॅड्सवर धूळ साचली की हवेचा प्रवाह कमी होतो. महिन्यातून एकदा पॅड्स पाइपच्या पाण्याने स्वच्छ करा. तसेच, पाण्याच्या टाकीत दर आठवड्याला पाणी बदलल्याने दुर्गंधी येत नाही आणि डास होत नाहीत. 

this blog was originally published on https://gajawaja.in/heatwave-some-useful-tips-about-cooler/

Comments

Popular posts from this blog

वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

उष्माघाताची ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने करा ही 5 कामे