Global Internet Infrastructure : इराण आता इंटरनेटवर घाला घालणार
अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या युद्धात इराणमधील सर्वच प्रमुख नेते मारले गेले आहेत. मात्र त्यानंतरही इराणने युद्धातून माघार घेतल्याची घोषणा केलेली नाही. उलट या युद्धाची दाहकता वाढली आहे. अमेरिकेचे मित्र असलेल्या आखाती देशांमधील तेल प्रतिष्ठाने आणि तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ले एवढे मोठे आहेत की, इराण हे युद्ध थांबवणार नाही, उलट ते अधिक काळ चालवणार हे उघड होत आहे. २८ फेब्रुवारी रोजी युद्धाला सुरुवात झाली. आता युद्धाला सुरुवात होऊन २१ दिवस झाले आहेत. यात संपूर्ण जगावर गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. मात्र इराण एवढ्यावरच शांत राहणार नाही. कारण आता संपूर्ण जगातील इंटरनेटवरच घाला घालण्याची योजना इराणमध्ये होत असल्याचा संशय आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जवळपास २०० फूट खोल पाण्यातून इंटरनेटच्या केबल्स जात आहेत. या केबल्स जर तोडल्या, तर जगातील इंटरनेट बंद होण्याचा धोका आहे. होर्मुझ मार्गावरून जगाची तेल आणि गॅससाठी कोंडी करणारा इराण आता जिद्दीला पेटला आहे. अमेरिका आणि इस्रायलचा बदला घेण्यासाठी इराण या केबल्सला हानी पोहोचवण्याच्या विचारात असल्याची बातमी आल्यानंतर जगभर खळबळ उडाली आहे. या केबल्स वास्तवात तोडल्यास त्याचे कोणत्या देशावर कसे आणि किती परिणाम होतील, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जगभर तेल आणि गॅसच्या किंमतींचा भडका उडाला आहे. अगदी अमेरिकेतही तेलाचे भाव वाढल्याने त्याची झळ सामान्य नागरिकांना बसू लागल्याची बातमी आहे. यातच युएई, दुबई, कतार, सौदी अरेबिया यांसारख्या देशांना इराणने अमेरिकेचे मित्र देश म्हणून क्षेपणास्त्रांच्या माऱ्याने बेजार केले आहे. या सर्वांचा त्या देशांतील पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. अब्जावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून रिअल इस्टेट क्षेत्रालाही आतापर्यंतची सर्वात मोठी झळ बसली आहे. यासोबतच पर्यावरणाची झालेली हानी आणि हे युद्ध चालू असेपर्यंत होणारा पर्यावरणाचा ऱ्हास याची भरपाई पुढील किमान २० वर्षांत तरी करता येणार नाही, असा अहवालही समोर आला आहे
या सर्व बातम्या चिंता वाढवणाऱ्या असताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराण आता अमेरिका आणि युरोपीय देशांना धडा शिकवण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीत टाकलेल्या पाण्याखालील इंटरनेट केबल्सना हानी पोहोचवण्याच्या विचारात आहे. जर या केबल्सचे नुकसान झाले, तर जगातील इंटरनेट सेवांवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. यानंतर पुन्हा एकदा होर्मुझच्या सामुद्रधुनीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून फक्त तेलाची वाहतूकच होत नाही, तर जगभरातील इंटरनेट व्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या केबल्सही याच मार्गातून जातात. २०० फूट पाण्याखाली असलेल्या फायबर-ऑप्टिक लाईन्सवरच संपूर्ण जगाचे इंटरनेट अवलंबून आहे. आता याच केबल्सला इराणने धक्का लावला, तर अख्खे जग ठप्प होण्याची भीती आहे.
असे झाल्यास सर्वप्रथम हातातील मोबाईल हा केवळ डब्ब्यासारखा होईल. व्हिडिओ कॉल्सपासून ते बँक व्यवहारांपर्यंत, खरेदीपासून विक्रीपर्यंतचे सर्व व्यवहार याच केबल्सच्या माध्यमातून होतात. जगभरातील लोकसंख्या वापरत असलेल्या इंटरनेटमधील डेटा प्रत्येक सेकंदाला याच केबल्समधून प्रवाहित होतो. त्यामुळेच या केबल्स म्हणजे जगाची जीवनरेखा आहे. इराण आता याच जीवनरेखेला तोडण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जगभर खळबळ उडाली आहे. खुद्द अमेरिकेतही या बातमीमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या भागात इराणने आधीच एक अंतर्गत मार्ग तयार केल्याचीही माहिती समोर आली आहे. यासोबतच इराणकडे घातक क्षेपणास्त्रांचा साठा आहे. शिवाय होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये इराणने भूसुरुंग पेरले आहेत. या भूसुरुंगांमुळे केवळ जहाजांनाच नव्हे, तर इंटरनेट केबल्सनाही धोका निर्माण झाला आहे. सध्या या भागात २० हून अधिक केबल्स टाकण्यात आल्या असून त्याद्वारे युरोप, आशिया आणि आफ्रिका खंड जोडले गेले आहेत. यामध्ये AAE-1, FALCON, गल्फ ब्रिज इंटरनॅशनल आणि टाटा-TGN गल्फ यांसारख्या केबल्सचा समावेश आहे. या केबल्स भारताच्या आंतरराष्ट्रीय इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठीही अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
म्हणूनच, जर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या केबल्सचे नुकसान झाले, तर आशिया, युरोप आणि आफ्रिका यांच्यातील डेटा वाहतूक विस्कळीत होऊ शकते. यामुळे इंटरनेटचा वेग मंदावेल आणि अनेक सेवांवर परिणाम होईल. भारतातही आंतरराष्ट्रीय कॉल्स, क्लाउड सेवा आणि ऑनलाइन बँकिंगवर परिणाम होण्याची भीती आहे. वास्तवात या केबल्सना हानी झाली, तर त्यांची दुरुस्ती करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. कारण पाण्याखालील केबल्स दुरुस्त करण्यासाठी विशेष जहाजे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. सध्या या भागात सुरू असलेल्या युद्धस्थितीमुळे अशी जहाजे पाठवणेही धोकादायक ठरणार आहे.
this blog was originally published on https://gajawaja.in/global-internet-infrastructure/
Comments
Post a Comment