Jaipur : गुलाल गोटा म्हणजे काय ?
होळी आणि त्यानंतर येणा-या रंगपंचमीच्या रंगात आता अवघा देश रंगायला सुरुवात झाली आहे. पुढचे काही दिवस या रंगाच्या उत्सवात अवघा देश रंगून जाणार आहे. अलिकडे रंग खेळण्यासाठी चीनमधील रंग येऊ लागले आहेत, अशी ओरड होत असली तरी या सर्वांवर मात करत जयपूरमधील गुलाल गोटाही सर्वाधिक पसंतीस पडत आहे. गुलाल गोटा म्हणजे, गुलालानं भरलेला एक गोळा. राजस्थानच्या जयपूरमध्ये मोठ्या प्रमाणात तयार होणा-या या गुलाल गोटांना फक्त भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अलिकडच्या काळात या गुलाल गोटांची लोकप्रियता वाढली असली तरी, हे गुलाल गोटा राजा, महाराजांच्या काळातील मानले जातात. पूर्वी राजे, आपल्या प्रजेबरोबर होळी खेळायचे, तेही हत्तीवर बसून. (Jaipur)
अशावेळी राजे रंग फेकण्यासाठी या गुलाल गोटांचा वापर करत असत. गुलाल भरलेले गुलाल गोटा फेकल्यावर रंगाची उधळण होतेच, मात्र त्यापासून कुठलिही हानी होत नाही. अत्यंत जुनी कला म्हणून या गुलाल गोटांकडे बघितले जाते. लाखाच्या बांगड्या करण्यासाठी जे लाख वापरले जाते, त्याच लाखेपासून हे गुलाल गोटा तयार केले जातात. सध्या या गुलाल गोटांमधील गुलालाची उधळण मथुरा, वृंदावन येथील होळीमध्येही करण्यात येत आहे. या गुलाल गोटा तयार करण्यासाठी जयपूरमधील मुस्लिम कुटुंबांचा पुढाकार आहे. पारंपारिक असलेल्या या व्यवसायातून तयार होणा-या उत्पादनाला एवढी मागणी आहे की, जेवढे गुलाल गोटा तयार होतात, तेवढ्या गुलाल गोटांची विक्री होते. त्यामुळे या व्यवसायाला व्यापक स्वरुप देण्याचा मानस राजस्थान सरकारनं व्यक्त केला आहे. (Marathi News)
राजस्थानमधील शाही होळी ही प्रसिद्ध आहे. येथील राजे, महाराजे होळीचे रंग खेळण्यासाठी गुलाल गोटांचा वापर करायचे. राजांच्या काळात प्रसिद्ध असलेल्या या गुलाल गोटांची मागणी काही काळ मर्यादित होती. मात्र सध्याच्या सोशल मिडियाच्या जमान्यात या गुलाल गोटांची प्रसिद्धी एवढी झाली आहे की, हे गुलाल गोटा तयार करणारे कारागिर होळीसाठी आलेली मागणी पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. राजस्थानच्या जयपूरमधील हे गुलाल गोटा कसे तयार होतात, हे जाणून घेण्यासारखे आहे. जयपूरमध्ये तयार होण-या या गुलाल गोटांमुळे जयपूरची नव्यानं ओळख लिहिली गेली आहे. जयपूरचे पारंपारिक उत्पादन असलेले गुलाल गोटा जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशात मोठ्या किंमतीनं खरेदी केले जातात. अर्थात भारतातही या गुलाल गोटांना मागणी वाढली आहे. करोडो रुपयांची उलाढाल करणारा हा व्यवसाय राजपूत राजांनी सुरु केला. (Jaipur)
राजपूतांच्या काळापासून चालत आलेली गुलाल आणि गोटे घालून होळी खेळण्याची परंपरा आजही त्याच पद्धतीने सुरू आहे. आजकाल जयपूरच्या बाजारपेठांमध्ये शाही गुलाल गोटे दिसू लागले आहेत. हा गुलाल जयपूरच्या मणिहार भागामध्ये बनवला जातो आणि तिथूनच विकला जातो. जयपूरमधील मणियारला जाणाऱ्या वाटेवर हे पारंपारिक गुलाल गोटे विकणारी अनेक दुकाने सध्या ग्राहकांच्या गर्दीनं फुललेली आहेत. याच मणियारमधील मुस्लिम कुटुंबे पिढीजात हे गुलाल गोटा तयार करीत आहेत. ही कुटुंब जवळपास सात पिढ्या या व्यवसायात आहेत. या व्यवसायाची सुरुवात राजांच्या मागणीनुसार झाली. होळीचा रंग खेळण्यासाठी काहीतरी वेगळे साधन त्यांना हवे होते. त्यामुळे लाखाच्या बांगड्या तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मणियारमधील कुटुंबांनी या लाखेचा वापर करत गुलाल गोटा तयार केले. लाखेपासून एक हलका असा गोळा तयार केला जातो, या गोळ्याला गरम असतानाच फुगवून त्यात गुलाल भरण्यात येता. या गुलाल गोटा व्यवसायात असलेले मणिहार समुदायाचे लोक लाखाच्या वस्तू बनवण्यातही तज्ञ आहेत. (Marathi News)
=============
हे देखील वाचा : Vanuatu : हा वानुआतु नावाचा देश नेमका आहे तरी कुठे..
Wilhelm Rontgen यांनी X-ray चा शोध चुकून लावला होता !
=============
जयपूरच्या या लाखाच्या बांगड्यांना जगभरातून मोठी मागणी आहे. ही कुटुंबे होळी जवळ आल्यावर हे गुलाल गोटा तयार करतात. या गुलाल गोटामध्ये आता गुलालासह अन्य रंगही भरले जातात. अलिकडे या गुलाल गोटामध्ये नैसर्गिक रंग भरण्यात येतात. त्याची किंमत जास्त असली तरी गुलाल गोटावरील कलाकुसर आणि त्याचा वापर झाल्यावर होणारी रंगाची उधळण यामुळे गुलाल गोटा मोठ्या प्रमाणात विकले जातात. या गुलाल गोटांची मागणी वाढल्यामुळे 300 हून अधिक कुटुंबे यात गुंतली आहेत. जयपूरमध्ये 18 व्या शतकापासून ही कला असल्याची माहिती यातील जुने कलाकार देतात. जयपूरसह मथुरा आणि वाराणसीमध्येही गुलाल गोटा तयार केले जातात. साधारण 20 ग्रॅमचे हे गुलाल गोटा अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे त्यांचे पॅकिंगही काळजीपूर्वक करावे लागते. सध्या या गुलाल गोटांना सोशल मिडियावर प्रसिद्धी मिळाल्यामुळे त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. (Jaipur) Top stories
सई बने
Original content is posted on : https://gajawaja.in/gulal-gota-in-rajasthan-marathi-info/
Comments
Post a Comment