Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !
राजस्थान म्हटलं की समोर येतात, ते तेथील भव्य किल्ले. जयपूर येथील जलमहल, जोधपूर येथील मेहरानगढ, उदयपूरचा भव्य कुंभलगड आणि पुष्करमधील जगातील एकमेव ब्रह्माजी मंदिर. याच राजस्थानच्या दालबाटीच्या चवीची भूल अवघ्या जगाला आहे. येथील मिर्चीबडाही सर्वत्र चवीनं खाल्ला जातो. पण याच राजस्थानची आणखी एक ओळख आता होऊ लागली आहे. या राजस्थानमधील अॅपल बोरांनी अवघ्या देशातील बाजारपेठ काबीज केल्याचे दृश्य आहे. राजस्थानच्या वाळवंटी भागात या अॅपल बोरांची शेती मोठ्याप्रमाणत होत आहे. सोबतच येथे लहान बोरांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत आहे. (Rajasthan) Top Stories
या बोरांच्या वाढत्या उत्पादनानं राजस्थानमध्ये बोरांपासून लोणचे, जॅम, सरबत तयार कऱण्यात येत आहे. अशा छोट्या फॅक्टरी या भागात सुरु झाल्या असून राजस्थानमधील महिलांनी या उद्योगात पुढाकार घेतला आहे. राजस्थानमधील बोरं आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या किंमतीला विकली जात आहेत. विशेष म्हणजे, काश्मीरमधील सफरचंदापेक्षा राजस्थानच्या अॅपल बोरांना जास्त किंमत मिळत आहे. राजस्थानमध्ये बोरांचे उत्पादन पारंपारिक पद्धतीनं घेतले जात होते. या बोरांपासून आत्तापर्यंत घरगुती पद्धतीनं पदार्थ बनवण्यात येत होते. मात्र या सर्वांला आता आधुनिक रुप प्राप्त झाले आहे. बोराच्या झाडाला राजस्थानी भाषेत बोरुंडी किंवा झंडी म्हटले जाते. (Social News)
राजस्थानमध्ये पारंपारिक बोरांबरोबरच अॅपल बोरांची शेती होत आहे. बोरांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखे घटक आढळत असल्यामुळे त्यांची मागणी वाढली आहे. यात राजस्थानची बोरं सरस ठरत आहे. विशेष म्हणजे, बोरांच्या झाडांसाठी राजस्थानमधील वाळू पोषक ठरली आहे. त्यामुळेच या अॅपल बोरांच्या शेतीमधून येथील शेतक-यांना मोठा फायदा मिळू लागला आहे. अजमेर जिल्ह्यामध्ये या अॅपल बोरांची शेती अधिक प्रमाणत होत आहे. याशिवाय नागौर, बिकानेर, बारमेर, नोखामध्येही बोरांच्या झाडांची लागवड वाढली आहे. पूर्वी या भागात गहू आणि कापसाची शेती करण्यात येत होती. गहू आणि कापसाच्या शेतीला पाण्याची जास्त आवश्यकता असते. पण बोरांच्या झाडांना अधिक पाण्याची गरज नसल्यानं शेतक-यांनी या भागात बोरांची शेती करण्याकडे आपला कल केला आहे. त्यातून त्यांच्या नफ्यातही वाढ झाली आहे. जवळपास तिप्पट नफा या बोरांच्या लागवडीतून अजमेर भागातील शेतक-यांना होत आहे. (Rajasthan)
अजमेरमध्ये ज्या शेतक-यांनी आपल्या शेतात बोरांची झाडे लावली आहेत, तिथे ठिबक सिंचन प्रणाली बसवल्यामुळे कमी पाण्यात अधिक बोराचे उत्पादन शेतक-यांना मिळत आहे. एक बोराचे झाड किमान 12 वर्ष सलग फळ देऊ शकते. त्याचा फायदा या शेतक-यांना होत आहे. कच्चा सफरचंदासारखी दिसणारी ही अॅपल बोरं चवीला अतिशय गोड असल्यामुळे आणि त्याच्यात अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे बाजारात चढ्या दरानं विकली जात आहेत. अजमेर पाठोपाठ भरतपूर जिल्ह्यातील चिकसाना या गावातही 60 टक्के शेतक-यांनी आपल्या शेतात अॅपल बोरांच्या झाडांची लागवड केली आहे. यात तरुण शेतक-यांचा अधिक भरणा आहे. हे तरुण शेतकरी, अत्याधुनिक तंत्राचा शेतीमध्ये वापर करीत असून त्यातून त्यांना अधिक नफा मिळत आहे. बोरांची शेती करण्यासोबत त्यांनी बोरांपासून तयार होणा-या पदार्थांची फॅक्टरीही सुरु केल्या आहेत. पोषक तत्वांनी युक्त असलेली बोरं ठराविक काळ झाडावर राहिली की सुकी होतात. (Social News)
==============
हे देखील वाचा : Wheat Grass Juice निरोगी शरीरासाठी अमृततुल्य आहे गव्हांकुराचा रस
Bihar : मखाना शेतीला चांगले दिवस !
===============
या सुक्या बोरांना बाजारात मागणी कमी असते. अशावेळी या सुक्या बोरांपासून अनेक पदार्थ तयार करण्यात येतात. राजस्थानमध्ये पारंपारिक पदार्थांमध्ये सुक्या बोरांचा वापर करण्यात येतो. आता तिच पद्धत वापरुन येथील महिला, एक गट करुन सुक्या बोरांपासून सरबत, जॅम, चॉकलेट तयार करत आहेत. यासोबत अनेक आयुर्वेद औषधांमध्येही बोरांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे राजस्थानच्या बोरांचे उत्पादन करणा-या शेतक-यांकडे अशा आयुर्वैद औषधांची निर्मिती करणा-या कंपन्या थेट जात आहेत. हे शेतकरी आपल्याकडील बोरांचे उत्पादन थेट या कंपन्यांना विकत आहेत. रोख दरात हा खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो. त्यातून संबंधित कंपनी आणि शेतक-यालाही फायदा होत आहे. औषध निर्माण करणा-या कंपनीला एकाच ठिकाणी उत्पादन मिळत आहे. तर शेतक-यांना एकाचवेळी रोख रक्कम मिळत असल्यामुळे शेतकरीही समाधान व्यक्त करीत आहेत. (Rajasthan) Top Stories
सई बने
Original content is posted on: https://gajawaja.in/rajasthani-bor-is-more-expensive-than-apples-marathi-info/
Comments
Post a Comment