Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कसे झाले ?

 




“मी, हर्षवर्धन वसंतराव सपकाळ भारतीय संविधानाच्या प्रति कटिबद्धता व्यक्त करीत छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वैरागयमुर्ती संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा वसा घेऊन सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी व पोशिंदा शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून व त्यांना स्मरून गांभीर्यपूर्वक शपथ घेतो, की मी विधानसभेत आमदार म्हणून ….. जय जगत!”

एखाद्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याला शोभेल अशा शब्दांमध्ये काँग्रेसचा तरुण आमदार जेव्हा विधानभवनात आमदारकीची शपथ घेतो, तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्यावर एकवटतात. २०१४ च्या मोदी लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि चौरंगी लढत असतानाही हा माणूस’ बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडून आला होता. भल्या भल्या मातब्बर उमेदवारांवर मात करत हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या पक्षालाच विश्वास नसलेली सीट अलगद निवडून आणली होती. मात्र पुढची पाच सहा वर्षे या माणसाची चर्चा होत नाही आणि आता अचानक या माणसाचं नाव समोर आलं आहे. आणि पुन्हा एकदा अनेक मातब्बरांना मागे सारत हा माणूस काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाला आहे. अनेकांनी, एवढंच काय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही यावर प्रतिक्रिया देताना हा कोण आहे? आणि याला प्रदेशाध्यक्षासारखं महत्वाचं पद का दिलं आहे असे प्रश्न विचारण्यास सुरवात केली आहे? त्यामुळे हे हर्षवर्धन सकपाळ नेमके कोण आहेत? त्यांनाच प्रदेशाध्यक्ष पॅड देण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत? महत्वाचं म्हणजे काँग्रेसचा हा प्रयत्नतरी यशस्वी होणार का? जाणून घेऊ.(Harshvardhan Sapkal)

हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. 2014 ते 2019 पर्यंत ते बुलढाण्याचे आमदार होते. 2019 मध्ये त्यांना पुन्हा तिकीट मिळालं होतं, पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र, या प्रवासाची सुरवातही त्यांनी अगदी तळागाळातून केली होती. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना च्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. अवघ्या 28 व्या वर्षी 1996 साली, ते बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. महाराष्ट्रातील सर्वांत तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष बनण्याचा मान त्यांनी प्राप्त केला होता. त्यांची आई महिला काँग्रेसची सदस्य होती, पण ते वगळता काँग्रेसच्या राजकारणाशी कुटुंबाचा फारसा संबंध नव्हता. पण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर सपकाळ यांना मात्र राजकारणाची गोडी लागली आणि आता त्यांचा प्रवास हा प्रदेशाध्यक्षपदापर्यंत आला आहे.

मात्र, या प्रवासात त्यांनी पक्षाच्या जास्त चर्चेत नसलेल्या, पण महत्वाच्या अशा पदांवर कामं केली आहेत. त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिवपदी काम केलं आहे. अनेक वर्षे राष्ट्रीय स्तरावर काम करत असताना राहुल गांधींनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे ते सदस्य राहिलेले आहेत. सोबतच त्यांनी उत्तराखंड, पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे, जरी जनतेला आणि राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना हे नाव परिचित नसलं तरी काँग्रेस हायकमांडपर्यंत हे नाव सगळ्यांना माहित होतं, ज्यामुळे काँग्रेस आज राज्यात सगळ्यात लोवर स्टेजवर असताना सकपाळ यांचा विचार झाला आहे.(Harshvardhan Sapkal)

हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष करण्यामागील पाच महत्वाची कारणं जाणून घ्यायची झाल्यास, पहिलं कारण म्हणता येईल ते म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्याला संधी देणं. काँग्रेसने साखर सम्राट, शिक्षण सम्राट किंवा मोठ्या घराण्यांतील नेत्यांऐवजी तळागाळातून पुढे आलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांना संधी दिली. त्यामुळे पक्षाच्या गोरगरीब व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसला आम्ही जनसामान्यांचे प्रश्न घेऊन लढतो आहोत असं पर्सेप्शन तयार करता येईल. महत्वाचं म्हणजे यामुळेच अमित देशमुख, बंटी पाटील हि नाव प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचं बोललं जात आहे.

दुसरं महत्वाचं कारण म्हणजे गटबाजीला आळा घालण्याचा प्रयत्न . विधानसभा निवडणुकीत आमदार अमित देशमुख, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमित देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात , माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नेते पक्षापेक्षा स्वतःची ताकद वाढवण्यातच अधिक गुंग असल्याचं चित्र होतं. थोडक्यात काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांमध्ये गटबाजी होती, जी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाचं एक कारण ठरली. अशा परिस्थितीत कोणत्याही मोठ्या गटाशी संलग्न नसलेले सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष बनवून पक्षांतर्गत संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा, असंही बोललं जात आहे.(Harshvardhan Sapkal)

तिसरं महत्वाचं कारण म्हणजे भाजपच्या डावाला निष्प्रभ करणे . भाजप अनेकदा काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना लक्ष्य करत आले आहे. चौकश्या ते निधीच्या माध्यमातून अनेक नेते भाजपच्या आश्रयाला जात आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे असंच एक उदाहरण असल्याचा आरोप झाला. मात्र, हर्षवर्धन सपकाळ हे नवखे व साध्या पार्श्वभूमीचे असल्याने भाजपकडून त्यांना सहजपणे लक्ष्य करता येणार नाही, ही काँग्रेससाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाची बाब आहे.

================

हे देखील वाचा :  Ranveer Allahbadia वादात अडकलेला रणवीर अलाहाबादिया आहे तरी कोण?

================

यामध्ये अजून एक कारण बऱ्याच पत्रकारांनीही सांगितलं आहे ते म्हणजे नेतृत्वाची उणीव आणि जबाबदारी स्वीकारण्याची तयारी. विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते जबाबदारी स्वीकारण्यास फारसे उत्सुक नव्हते. कारण पक्ष सध्या अत्यंत बिकट परिस्थिती आहे. संघटनेत उत्साह राहिलेला नाही. सोबतच अनेक काँग्रेस नेते शिक्षण संस्था आणि कारखान्यांमुळे अनेक नेते सावध भूमिका घेत होते. कोणीही पुढे येऊन आक्रमक स्टॅन्ड घेताना दिसलं नाही. अशावेळी जबाबदारी घेण्यास तयार असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांना ही संधी मिळाली.(Harshvardhan Sapkal)

यातून काँग्रेसचा अजून एक महत्वाचा उद्देश असणार आहे, तो म्हणजे काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना पुन्हा एकत्र करण्याची संधी. काँग्रेसचा पारंपरिक मतदार वर्ग गेल्या काही वर्षांत कमकुवत झाला आहे. दलित अल्पसंख्याक ते लो इन्कम ग्रुप्स यांना टार्गेट करण्यासाठी काँग्रेसच्या मुशीत तयार झालेला आणि काँग्रेसी विचारधारा या मतदारांपर्यंत पोहचवणारा चेहरा काँग्रेसला हवा होता. अशावेळी, तळागाळातून आलेला प्रदेशाध्यक्ष दिल्याने हा मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळेल, अशी अपेक्षा पक्षाला आहे. त्यामुळे पक्षाची गटबाजी संपवून नव्या उमेदीने काँग्रेसला उभारण्याची जबाबदारी सपकाळ यांच्यावर टाकण्यात आली आहे. आता ते यात किती यशस्वी होतात, हे कळेलच. राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका ही सकपाळ यांच्या नेतृत्वाची पहिलीकसोटी असणार आहे. Top Stories

Original contet is posted on: https://gajawaja.in/harshvardhan-sapkal-how-did-harshvardhan-sapkal-become-the-state-president-of-congress-marathi-info/



Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Prayagraj : महाकुंभमध्ये काय बघाल !