‘या’ मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुरुषांना करावा लागतो शृंगार
भारतामध्ये अनेक मंदिरं आहेत. मंदिरांचा देश म्हणून जरी भारताचा उल्लेख केला तरी वावगे ठरणार नाही. कारण आपल्या देशात मंदिरांची संख्या खूपच मोठी आहे. या मंदिरांपैकी बहुतांशी मंदिरांचा इतिहास खूपच जुना आणि गौरवशाली आहे. प्रत्येक मंदिराची आपली एक परंपरा आणि खासियत आहे. काही प्रथा अतिशय वेगळ्या आणि आश्चर्यकारक देखील आहेत.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराबद्दल सांगणार आहोत, ज्या मंदिराची एक परंपरा आहे, जी ऐकून नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर अनेक भाव एकत्र दिसतील. तसे पाहिले तर भारताच्या दक्षिण भागातील मंदिरांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रथा पाहायला मिळतात. हे मंदिर देखील दक्षिणेतलेच आहे. या मंदिराची खासियत अतिशय हटके आहे. या मंदिरात पुरुषांना पूजा करायची असेल तर त्यांना महिलांसारखे सजून धजून मंदिरात जावे लागते. त्यानंतरच त्यांना मंदिरात प्रवेश मिळतो.
ऐकून नवल वाटले ना…? मात्र हे खरे आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यात कोट्टनकुलंगरा श्रीदेवी एक अनोखे मंदिर आहे. या मंदिरात पुरुषांना प्रवेश करण्यास बंदी आहे. मात्र तरीही पुरुष मंदिरात प्रवेश करतात, पण तो पुरुष म्हणून नाही तर स्त्री बनून. देवीच्या पूजेची ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे.
केरळमध्ये तिरुवनंतपूरमपासून ८२ किलोमीटर अंतरावर कोटकुलनारा नावाचे एक छोटेसे गाव आहे. येथे ‘श्रीदेवी’ नावाचे एक मंदिर आहे. प्रत्येक वर्षी येथे एक वेगळ्या प्रकारचा ‘देवी दरबार’ भरतो, ज्याला चमयविलक्कू महोत्सव म्हणतात. वर्षातील दोन दिवस जवळपासच्या गावातील आणि लांबच्या ठिकाणाहून देखील हजारो पुरुष साड्या, लहेंगे परिधान करून येथे येतात. चेहऱ्यावर भरपूर मेकअप असतो, हातामध्ये बांगड्या घातलेल्या असतात. डोक्यावर विगमध्ये गजरा, मेहंदी, लिपस्टिक, काजल लावून पुरुष स्त्रीप्रमाणे सजतात.
मार्च महिन्यात १० ते १२ दिवस हा उत्सव साजरा होतो. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी पुरुष महिलांसारखे नटतात. महिलांसारखी साडी नेसतात. दागिने घालतात. मेकअप करतात. केसांना फूल लावतात. दाढी मिश्या काढून टाकतात. अगदी महिलांसारखेच नटून सजून घेतात. या मंदिरात पुरुषांना प्रवेश बंदी आहे. या मंदिरात देवीची पूजा करण्यास फक्त महिला व तृतीयपंथीयांना परवानगी आहे. जर एखाद्या पुरुषाला देवीचे दर्शन किंवा पूजा करायची असेल तर त्याला स्त्रीप्रमाणेच १६ श्रृंगार करावे लागतात.
हे सर्व पुरुष ट्रान्सजेंडर नसतात. फक्त या उत्सवासाठी ते या रूपात तयार होतात. अनेक लोकं तर याच रूपात आपल्या पत्नी-मुलांसोबत या उत्सवासाठी येतात. या मंदिरामध्ये लोकं त्यांच्या इच्छापूर्तीसाठी नवस बोलतात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी पुरुष स्त्री रूपात येथे येतात.
ज्यांच्याकडे मेकअपचे साहित्य नाही, अशा इतर शहरांतून येणाऱ्या पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र मेकअप रूम तयार करण्यात आली आहे. जिथे ते महिलांप्रमाणे 16 प्रकारचे मेकअप करतात. या मंदिरात जाण्यासाठी कपडे इत्यादींबाबत नियम व अटी असू शकतात, परंतु वयाचे बंधन नाही. येथे सर्व वयोगटातील पुरुष महिलांसारखे कपडे घालून देवीची पूजा करू शकतात.
या प्रथेची सुरुवात केव्हा आणि कशी झाली, याविषयी अशी ठोस कोणतीही माहिती नाही. मात्र जनकऱ्यांकडून सांगण्यात येणाऱ्या एका कथेनुसार, अनेक दशकांपूर्वी कोटकुलनारा गावात लहान मुले मुलींचा वेश करून खेळ खेळायचे. मुले नारळाने खेळत होते. अचानक नारळ एका दगडावर पडला आणि फुटला. नारळातून रक्तासारखा लाल रंगाचा द्रवपदार्थ बाहेर पडला. येथून एक पुजारी चालला होता. पुजाऱ्याला त्या दगडामध्ये देवाचे रूप आणि चमत्कारिक शक्ती दिसली.
पुजाऱ्याने मुलांना तेथेच तो दगड स्थापित करून दगडाला देवी मानून पूजा करण्यास सांगितले. त्यावेळी ती मुले मुलीच्या वेशात होते. पुजाऱ्याने त्यांना त्याच अवतारात देवीची पूजा करण्यात सांगितले. तेव्हापासून मुलांना मुलगी बनवून श्रीदेवी’ची पूजा करण्याची प्रथा सुरु झाली.
या मंदिरात देवी प्रकट झाल्याचे येथील लोकांची मान्यता आहे. तसेच हे एकच असे मंदिर आहे की, याला वरील छत नाही. मंदिरात प्रत्येक वर्षी २३ आणि २४ मार्चला चाम्याविलक्कू उत्सव साजरा केला जातो. पुरुष महिलांसारखी वेशभूषा करून हातात जळता दिवा घेऊन मंदिरात जातात. पहाटे २ वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत पूजा करण्याची सर्वात शुभ वेळ मानली जाते. यावेळी पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होते, अशी मान्यता आहे. top stories
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली असून, याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)
Original content is posted on: https://gajawaja.in/kottankulangara-devi-temple-where-men-in-womens-attire-for-goddess-puja-marathi-info/
Comments
Post a Comment