आतिशी मार्ले दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री
आपल्या देशातील राजकारणामध्ये सतत अनेक अनपेक्षित अशा गोष्टी घडताना दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे तुरुंगात होते. अरविंद केजरीवाल यांना ईडीने २१ मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक केली होती. यानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. Top stories.
सीबीआयच्या खटल्यात त्यांना १३ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. तर, ईडीच्या खटल्यात त्यांना आधीच जामीन मिळाला होता. त्यामुळे ते १३ सप्टेंबरला तिहार तुरुंगातून बाहेर आले. नंतर १५ सप्टेंबर रविवार रोजी आप कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केली.
अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा रंगली होती. आता या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. आतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत. आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. याआधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित या दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री राहिल्या होत्या. त्यानंतर आता आतिशी यांचा देखील या यादीमध्ये समावेश झाला आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांच्यापासून अनेक नावं चर्चेत होती. मात्र, आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या अनुपस्थितीत आतिशी यांनीच दिल्ली सरकारचे कामकाज पाहिले होते. शिक्षण, अर्थ, महसूल, कायदा अशी अनेक महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत त्यांनी सर्वच गोष्टींना अगदी समर्थपणे तोंड दिले. केजरीवाल आणि दिल्ली सरकारसोबत त्या अगदी भक्कम उभ्या होत्या.
दिल्ली मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री असलेल्या आतिशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा पदभार देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तसा प्रस्तावही सादर केला आहे. त्यानुसार, 26 आणि 27 सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेच अधिवेशन होणार असून, या 2 दिवसांच्या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार असल्याची माहिती आहे.
आतिशी यांची आम आदमी पार्टी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली आहे. त्या आता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असणार आहेत. आतिशी आज 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांची भेट घेतील आणि त्यानंतर त्या सरकार स्थापनेचा दावा करतील. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी मंत्री आतिशी यांना त्यांच्या जागी पुढील मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव ठेवला, जो आप आमदारांनी एकमताने स्वीकारला. या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी केजरीवाल यांनी सांगितलेल्या नावाला सहमती दर्शवली आहे.
कोण आहेत आतिशी मार्लेना?
आतिशी या आम आदमी पार्टीमधील वरिष्ठ नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या.
याच काळात आतिशी या केजरीवाल व इतर नेत्यांच्या संपर्कात आल्या. पुढे त्यांनी आम आदमी पार्टीद्वारे राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्या दिल्लीतल्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी दिल्लीच्या शिक्षण मंत्रालयासह, सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री म्हणून देखील काम केलं आहे. त्या आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्य देखील आहेत. Marathi news.
Comments
Post a Comment