अजित पवार – हताश की हुशार?

 Ajit Pawar VS Sharad Pawar


तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची लगीनघाई सुरू व्हायला हवी होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर केल्या, परंतु कायदा व सुव्यवस्था तसेच अतिवृष्टीचा हवाला देत महाराष्ट्राच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीला काहीसा वेळ मिळाला आहे. Top stories.

समजा निवडणुका लागल्या असत्या तर सगळ्या पक्षांनी कुठल्या भूमिका घेतल्या असत्या? आताच्या घडीला पाहिलं तर भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांची भूमिका पक्की दिसते. लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश धुऊन काढण्यासाठी भाजपला विधानसभा निवडणुकांची प्रतीक्षा आहेस तर त्याच लोकसभा निवडणुकीत हाताला लागलेले यश आणखी वाढवून राज्याची सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस उतावीळ झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये चाललेली लठ्ठलठ्ठी पाहून त्यानुसार निर्णय घेण्याचे शरद पवार यांनी ठरविलेले दिसते, तर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे अडून बसले आहेत. (Ajit Pawar VS Sharad Pawar)

या सर्वांमध्ये सगळ्यात गोंधळलेला आणि कुठल्या दिशेला जायचे याचा किंचितही अंदाज न येणारा नेता म्हणजे अजित पवार. एक वर्षांपूर्वी काका शरद पवार यांच्या विरोधात बंड करून सत्तेत सामील झालेल्या अजित पवार यांच्याकडे असलेला उत्साह आणि धडक आज किंचितही दिसत नाही. अगदी न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत काकांशी दोन हात करून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्या पक्षाचे चिन्ह मिळवले खरे. परंतु त्याच काकांच्या हातून, चुलत बहिणीच्या रूपाने बारामती या आपल्या घरच्या मैदानावर अजित पवारांना मात खावी लागली. त्या एका पराभवाने ते कोलमडून गेलेले दिसत आहेत. किंवा मग काकांच्या पावलावर पाऊल टाकून हूल देण्यासाठी घेतलेला हा त्यांचा पवित्रा असू शकेल.

बारामती लोकसभा मतदारसंघात अजितदादांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवले. नणंद भावजयीच्या त्या लढाईत अखेर नणंदेने बाजी मारली. तेव्हापासून अजितदादा स्वकीय तसेच विरोधकांच्या रडारवर आले आहेत. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेतल्याने कुठलाही फायदा झाला नाही, उलट भाजपचा मतदार दुखावला, असे विश्लेषण एका गटाने केले. महायुतीत कोणालाही अजितदादा नको आहेत, अशा चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे अजितदादा खरोखर महायुतीत राहणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला. (Ajit Pawar VS Sharad Pawar)

या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या वक्तव्यांना खूप महत्त्व येते. बारामतीत उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांना उतरवणे ही चूक होती, असे अजित पवार यांनी एके ठिकाणी सांगितले. तसेच बारामती विधानसभा मतदारसंघात आता विधानसभा निवडणूक लढविण्याची आपल्याला इच्छा नाही, असेही त्यांनी जाहीर केले. ही दोन्ही वक्तव्ये अजित पवार यांनी हार मानल्याचे निदर्शक आहेत आणि ते आपले काका शरद पवार यांच्याकडे परत जाण्यासाठी उत्सुक आहेत, असा त्याचा अर्थ काढण्यात आला.

अजित पवारांची आजवरची कारकीर्द बघितली तर हा अर्थ काढणे फारसा चूक नाही. शरद पवार काय किंवा अजित पवार काय, या दोघांचाही पिंड संघर्षाच्या राजकारणाचा नाही. शक्यतोवर सत्तेच्या जवळ राहायचे आणि पक्षाचा विस्तार करायचा हे त्यांचे धोरण राहिले आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव पचवून पुढे संघर्ष करणे अजित पवारांच्या मानाने तसे अवघडच आहे. महायुतीच्या संसारात नावडती म्हणून नांदण्यापेक्षा सख्ख्या काकांसोबत जाणे त्यांना केव्हाही सोपे आहे. वर त्यांना आपण परत घेण्यासाठी उत्सुक आहोत, हे शरद पवारांनीही सूचित केले आहेत. (Ajit Pawar VS Sharad Pawar)

मात्र एक आणखी शक्यता आहे आणि ती सुद्धा तेवढीच दाट आहे. ज्यांच्या तालमीत अजित दादा पवार तयार झाले आहेत ते शरद पवार फसवी वक्तव्ये करण्याबद्दल नेहमीच प्रसिद्ध आहेत. किंबहुना तीच त्यांची ओळख आहे. शरद पवार यांनी जांभई दिली तरी त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात, असे राजकारणात बोलले जाते. या संदर्भात एक किस्सा आठवतो. वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात बनावट मुद्रांक घोटाळा गाजत होता. अब्दुल करीम तेलगी हा त्यातला मुख्य आरोपी होता. त्याची नार्कोटेस्ट केली तेव्हा त्याने छगन भुजबळ यांचे नाव घेतले होते. त्यानंतर विरोधकांनी भुजबळ यांचा राजीनामा घेण्यासाठी आकाश पाताळ एक केले होते. तेव्हा केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांची जोमाने पाठराखण केली होती. छगन भुजबळ यांनी राजीनामा देण्याची कोणतीही गरज नाही असे स्पष्ट करून आपणही त्यांचा राजीनामा घेणार नाही, हे त्यांनी निक्षून सांगितले होते. (Ajit Pawar VS Sharad Pawar)

Ajit Pawar VS Sharad Pawar

त्यावेळी शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामना हे वृत्तपत्र बाळासाहेब ठाकरे यांच्या देखरेखीखाली निघत होते त्यातल्या एका अग्रलेखात हा सर्व घटनाक्रम मांडून म्हटले होते, की शरद पवार जे बोलतात त्याच्या नेमके उलट करतात. त्यामुळे आज जर ते छगन भुजबळ यांना अभय देत असतील तर उद्या भुजबळांचा ते बळी देणार एवढे नक्की आणि खरोखर घडलेही तसेच. शरद पवारांचे ते वक्तव्य आल्यानंतर दोन दिवसांच्या आत मुद्रांक घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला. आता अजितदादा पवार यांच्यासोबत गेल्यानंतर मागील एक-दोन वर्षांत भुजबळांनी त्या घटनेचा उल्लेखही केला आहे. सांगायचे तात्पर्य हे, की आपल्याला जे करायचे आहे त्याच्या नेमके उलट बोलायचे ही पवारांच्या राजकारणाची ओळख आहे. आपल्या काकांच्या छत्रछायेत वावरूनही अजित पवारांनी स्वतःला त्या शैलीपासून नेहमीच दूर ठेवले आहे. बेधडक आणि स्पष्टवक्ते नेते म्हणूनच त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या शैलीचे कौतुकही होते व त्यावर टीकाही होते. परंतु मुख्य मुद्दा हा आहे, की त्यातून ते आजवर यशस्वी झाले आहेत. (Ajit Pawar VS Sharad Pawar)

एक वेळ अशी आली होती की अजित पवार यांचा हा धडाका त्यांच्या सहकारी पक्षांनाही डोईजड झाला होता. विशेषतः आदर्श घोटाळ्यानंतर जेव्हा पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आले, तेव्हा अजित पवारांनी सगळा कारभार आपल्या हाती घेतला होता. चव्हाण हे महाराष्ट्राला नवख्या असल्यामुळे मंत्रालयाची सर्व सूत्रे अजित पवार हाकत होते. त्यांची ही सक्रियता काँग्रेस नेत्यांना खुपत होती. त्याबद्दलच्या तक्रारी जेव्हा वाढल्या तेव्हा पत्रकारांनी एकदा अजित पवारांनाच याबद्दल छेडले होते. तेव्हा अजितदादा म्हणाले होते, “हो, मी आहेच टग्या.” परंतु सध्या अजित पवार एकाकी पडले आहेत. पराभवाने त्यांना बरेच काही शिकविले आहे. म्हणून आपल्या आजवरच्या शैलीला फाटा देत कदाचित त्यांनी काकांचा हा धूर्तपणाचा मार्ग स्वीकारला असावा. (Ajit Pawar VS Sharad Pawar)

===================

हे देखील वाचा : शरद पवार अजितदादांना जागा देतील ?

====================

शक्तीचे राजकारण खूप झाले, आता युक्ती वापरून बघूया, असा होरा त्यांनी बांधला असावा. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, हे त्यांना पटले असावे. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सफाईदार राजकारण्यासोबत वावरल्यामुळे कदाचित त्यांनी हे कौशल्य आत्मसात केले असावे. त्यामुळे ज्याप्रमाणे आपल्या काकांनी आजवर विरोधकांना कात्रजचा घाट दाखवला, त्याचप्रमाणे वेगवेगळी वक्तव्ये करून गोंधळ निर्माण करायचा आणि आपले इप्सित साध्य करायचे, हा बाणा त्यांनी अंगी बाणवला असावा. सध्या तरी अजित पवार यांच्या वक्तव्यांचे हे दोन अर्थ निघतात. लोकांना त्यांची जी हताशा वाटते, ती त्यांची हुशारीसुद्धा असू शकते. सध्याच्या राजकारणात सर्वांच्या नजरा आपल्यावर आहेत, हे अजित पवारांना पूर्णपणे माहीत आहे. म्हणून जाणूनबुजून दिशाभूल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असावा. खरे खोटे ‘देवा’लाच ठाऊक! (Ajit Pawar VS Sharad Pawar) Top stories.

Comments

Popular posts from this blog

Himalayan gold hit by climate.

Putin warned 'Bachke rehna re baba..'

Planning to tour through a travel package? Read this first