राष्ट्रध्यक्षांच्या निधनानंतर इराणमध्ये आनंदोत्सव का झाला ?
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री प्रवास करीत असलेल्या हेलिकॉप्टरला अपघात झाला असून या अपघातात राष्ट्राध्यक्ष रायसी आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांचा मृत्यू झाला. ही बातमी आली आणि जगभर हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र ज्या इराणचे राष्ट्राध्यक्ष विमान अपघातात गेले, त्या इराणमध्ये काय परिस्थिती होती, हे जाणून घ्याल तर आश्चर्यचकीत व्हाल. कारण इराणच्या काही भागात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या मृत्यू झाल्याची बातमी आली आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला. इराणमध्ये अनेक ठिकाणी लोक उत्सव साजरा करतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाल्यानं या नागरिकांनी आनंद व्यक्त करीत फटाकेही फोडले आहेत. (Iran)
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचे निकटवर्तीय असलेले इब्राहिम रायसी यांच्या अपघाती मृत्युने अनेकांना धक्का बसला आहे. हा अपघात की घातपात अशी शंकाही व्यक्त केली जाऊ लागली आहे. यातील पहिली शंका इस्त्रायलवर घेण्यात आली. मात्र इब्राहिम रायसी यांना त्यांच्याच देशातूनही टोकाचा विरोध होता. ‘गंभीर मानवाधिकारांचे उल्लंघन‘ केल्याबद्दल रायसी वॉशिंग्टनच्या प्रतिबंधात्मक काळ्या यादीत होते. इराणची अणुशक्ती वाढवण्यासाठीही ते सातत्यानं प्रयत्न करीत होते. (Iran)
त्यामुळेच त्यांचे शत्रू अनेक होते. प्रत्यक्ष इराणमध्ये त्यांना ‘तेहरानचा कसाई‘ अशा नावांनी ओळखण्यात येत होतं. इब्राहिम रायसी यांच्या मृत्यूची पुष्टी होताच, इराणच्या सरकारी टीव्हीवर देशभरातून त्यांची छायाचित्रे दाखण्यात येऊ लागली. त्यावेळी इराणच्या काही भागात आनंद साजरा करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या अपघाती मृत्यूनंतर सर्वात मोठा जल्लोष इराणच्या कुर्दिस्तान भागात साजरा झाला. येथील साकेज शहरात लोकांनी फटाके फोडून रायसींचा मृत्यू साजरा केला.
कारण इराणमध्ये हिजाबच्या विरोधात निदर्शनांचा चेहरा बनलेल्या महसा अमिनी यांचे साकेज हे मूळ गाव आहे. महसा अमिनीने इराणमध्ये हिजाबच्या विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये भाग घेतला. इराणच्या महिलांसाठी तिने आंदोलन केले. त्याच महसा अमिनीला इराणच्या पोलीसांनी ज्या पद्धतीनं मारले आहे, ते साकेज येथील जनता कधीही विसरु शकत नाही. महसा अमिनीला इराणच्या पोलिसांनी हिजाब शिवाय बाहेर पडल्याबद्दल अटक केली आणि तिला बेदम मारहाण केली. रुग्णालयात उपचारादरम्यान अमिनी यांचा मृत्यू झाला. २२ वर्षीय महसा अमिनीच्या मृत्युनंतर इराणमधील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. (Iran)
२०२१ मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी रायसी यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. या काळात अनेक वादांमुळेच ते चर्चेत राहिले. त्यांच्यावर चळवळी आणि विरोधकांना क्रूरपणे दडपण्याचा आरोप होता. देशांतर्गत राजकारणात कठोर भूमिका घेण्यासाठी रायसी ओळखले जात होते. हसन रुहानी यांच्यानंतर रायसी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. रुहानी यांच्याकडे संयमी नेता म्हणून पाहिले जात होते पण रायसी यांची भूमिका त्यांच्याविरुद्ध होती. रायसी अध्यक्ष झाल्यानंतर इराणमध्ये महिलांच्या पेहरावावर आणि वागण्यावर निर्बंध घालणारे कायदे लागू करण्यात आले.
=============
हे देखील वाचा : विमानतळावर कोणत्या शब्दांचा वापर करण्यावर बंदी? अन्यथा तुरुंगात जावे लागेल
=============
इराणचा हिजाब कायदा कडक केला. यालाही मोठा विरोध झाला. २०२२ मध्ये इराणमध्ये महिलांची सर्वाधिक आंदोलने झाली. त्यांनी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना विरोध केला. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणमधील ही सर्वात मोठी निदर्शने ठरली. या निदर्शनांमध्ये शेकडो लोक मारले गेले. (Iran)
यावेळी रायसी यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलकांवर धडक कारवाई करून आंदोलन चिरडले. इब्राहिम रायसी हे इराणच्या निर्वासित विरोधी पक्ष आणि मानवाधिकार गटांबद्दलही खूप आक्रमक होते. रायसी हे १९८८ मध्ये मार्क्सवादी आणि डाव्या विचारांच्या सामूहिक फाशीचे कारण बनले. त्यांनी मनमानीपणे हजारो कैद्यांना फाशीची शिक्षा दिली. पाच हजारांहून अधिक लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली. १९८८ च्या या सामूहिक फाशी प्रकरणानंतरच रायसी यांना ‘तेहरानचा कसाई‘ बोलण्यात येऊ लागले होते. या सर्व वादांमुळे रायसी यांचे अनेक शत्रू इराणमध्येच होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू इराणमधीलच राजकारणातून झाला काय अशीही चर्चा सुरु आहे.
Original content is posted on: https://gajawaja.in/why-was-there-a-celebration-in-iran-after-the-death-of-the-president-marathi-info/
Comments
Post a Comment